खाशाबांच्या संघर्षगाथेला प्रकट वाचनातून मानवंदना
पद्म पुरस्कारपासून एकटे खाशाबा वंचित – संजय दुधाणे
कराड २५ सिटी न्यूज नेटवर्क
ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या संघर्षगाथेला टिळक हायस्कूलमध्ये प्रकट वाचनातून अनोखी मानवंदना देण्यात आली. ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या यादीत एकटे खाशाबा पद्म पुरस्कारापासून वंचित असल्याची खंत प्रकट वाचन स्पर्धेच्या बक्षिस समारंभात लेखक संजय दुधाणे यांनी व्यक्त केली.
भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव संजय दुधाणे लिखित चरित्र वाचन स्पर्धा कराडमधील टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी लेखक आपल्या शाळेत हा उपक्रमही राबविण्यात आला. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्र पुस्तकाचे लेखक संजय दुधाणे यांच्या हस्ते वाचन स्पर्धेतील विद्यार्थींला बक्षिस देण्यात आले. याप्रसंगी आकाशवाणीच्या निवेदिका सीमा मकोटे, शाळेचे उपमुख्याध्यापक पंडित मोरे, पर्यवेक्षिका सौ वैशाली भोपळे, कार्याध्यक्ष वैभव सावंत व शिक्षक उपस्थित होते.
प्रकट वाचन स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी खाशाबा जाधव यांच्या संघर्षमय जीवनाचा अभ्यास केला. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि अडथळ्यांवर मात करत त्यांनी ऑलिम्पिक पदकापर्यंत केलेला प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक-एक रुपया जमा करून समाजाने केलेली मदत आणि त्यामागील प्रेरणादायी कथेचे स्मरण विद्यार्थ्यांनी करून खाशाबांना मानवदंना दिली. इयत्ता ६ ते १० पर्यंतच्या विद्यार्थींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान लेखक संजय दुधाणे व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व "ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव" हे चरित्रग्रंथ देऊन करण्यात आला. मुख्याध्यापक एस. एस. शिंदे यांनी स्पर्धेचे संयोजन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लेखक संजय दुधाणे यांनी या चरित्रग्रंथाच्या निर्मितीपासून गेल्या पंधरा वर्षांतील संशोधन आणि लेखन प्रवासातील विविध अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. "जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचा संघर्ष प्रत्येकाने कायम डोळ्यांसमोर ठेवावा आणि त्यातून प्रेरणा घ्यावी," असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र शासनाने खाशाबानंतर ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सर्व विजेत्यांना पद्म पुरस्काराने गौरवित केले आहे. यामध्ये आद्य पदक विजेते खाशबा वंचित असून त्यांना पद्मविभूषण पुरस्कार यंदा जाहिर होईल हीच साऱ्या महाराष्ट्राची अपेक्षा असल्याचे संजय दुधाणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
स्पर्धेतील विजेते :
प्रथम – शौनक विदार, व्दितीय – चैतन्य किरपेकर, तृतीय – इंद्रकुमार सोलंकी
उत्तेजनार्थ – अरिहंत पवार व अव्दैत वाघमारे

Comments
Post a Comment