विवाहातील आहेर अंधशाळेला मान्यवराच्या उपस्थितीत प्रदान - वाझे परिवाराचा समाजापुढे आदर्श
कोल्हापूर ११ सिटी न्यूज नेटवर्क
विवाह समारंभातील आहेर, भेटवस्तू आणि पाकिटे स्वीकारण्याऐवजी ती रक्कम अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवत वाझे परिवाराने समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमातून जमा झालेली सव्वा लाख रुपयांची मदत ज्ञान प्रबोधन संचलित अंधशाळेला शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.
कोल्हापुरातील सुधर्म हिंदुराव वाझे यांचे सुपुत्र सिद्धार्थ यांचा विवाह रक्षता खटावकर यांच्याशी नुकताच संपन्न झाला. विवाहानिमित्त नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतकांना आहेर, भेटवस्तू किंवा पाकिटे न देता अंधशाळेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे विवाहानंतरही जवळपास सहा महिने मदतीचा ओघ कायम राहिल्याने सव्वा लाख रुपयांचा निधी जमा झाला.
ज्ञान प्रबोधन संचलित अंधशाळा अनेक वर्षांपासून उपेक्षित अंध विद्यार्थ्यांना शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या जडणघडणीत दिवंगत हिंदुराव वाझे यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या समाजसेवेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे सुधर्म वाझे यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना नेते सत्यजित (नाना) कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास, कोल्हापूर प्रेस क्लब चे शितल धनवडे ,काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक अश्किन आजरेकर, नगरसेविका दीपा अजित ठाणेकर, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, आरोग्य मित्र डॉ. संदीप पाटील, बाबा महाडिक, उद्योगपती अभय देशपांडे, दिलीप पाटील (माजी अध्यक्ष, राजाराम सहकारी साखर कारखाना) हदय स्पर्श चे पद्माकर कापसे, प्रा. किरण पाटील, दत्ताजीराव वाझे, हरिभाऊ वाझे, राजीव जामसांडेकर यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. बच्चनवेडे, प्रदक्षिणा, वांड कोल्हापूर, क्रिकेटवेडे आणि साई सर्व्हिस या समूहांच्या सदस्यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ नलावडे यांनी, तर आभार डॉ. सुहास बोन्द्रे यांनी मानले. उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व दात्यांचे सुधर्म हिंदुराव वाझे यांनी आभार मानल्यानंतर विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली .

Comments
Post a Comment