हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भरपावसात ‘पावनखिंड मोहीम’ अन् इतिहासाचा जागर !
नरवीर बाजीप्रभू देशपांडे, नरवीर शिवा काशीद यांच्या वंशजांची उपस्थिती !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे हिंदु राष्ट्रासाठी बलिदान करण्याचा संकल्प करा ! - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर 30 सिटी न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराज नेहमी युद्धसज्ज होते. त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात पूर्णतः स्वदेशी तंत्र विकसित केले होते. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, मात्र या स्वातंत्र्यात आपण आपले असे ‘स्व’राज्य निर्माण करू शकलो नाही. त्यासाठी आपल्याला यापुढील काळात प्रयत्न करावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य ‘अटक ते जिंजी’ असे सुमारे १ हजार ५०० किलोमीटरपर्यंत विस्तारले होते. शिवछत्रपतींचे कार्य इतके महान आहे की, त्यांना ‘चक्रवर्ती सम्राट’ ही पदवी शोभून दिसते. नरवीर बाजीप्रभू देशपांडे, नरवीर शिवा काशीद, फुलाजीप्रभू यांसह असंख्य मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी प्राणार्पण केले. त्यांचाच आदर्श समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे हिंदु राष्ट्रासाठी बलिदान करण्याचा संकल्प करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी येथे केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तिथीनुसार बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या ३० जुलै या दिवशी तिथीनुसार असलेल्या बलिदानदिनी ‘पावनखिंड मोहीमे’चे आयोजन करण्यात आले होते. भरपावसात पार पडलेल्या या मोहिमेमुळे उपस्थितांमध्ये नवचेतना जागृत झाली. इतिहासाचे स्मरण झाले आणि घोषणांमुळे परिसर शिवमय झाला. या प्रसंगी सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थितीसह नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज श्री. संदेश देशपांडे आणि नीलेश देशपांडे, सरदार कमळोजी साळुंखे यांचे वंशज श्री. सुहासदादा साळुंखे, तसेच नरवीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. गौतमेश तोरस्कर यांनी सांगितलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पन्हाळा येथे नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संघर्षाविना हिंदु राष्ट्र मिळणे अशक्य ! - सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी संघर्षातून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्याचप्रमाणे आजही हिंदु राष्ट्र सहजासहजी मिळणार नाही. संघर्षाशिवाय ते प्राप्त होणे अशक्य आहे. मावळे युद्धभूमीवर ‘हर हर महादेव’चा घोष करत असत. त्याप्रमाणे आपणही रामराज्य स्थापनेसाठी प्रतिदिन ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप केला पाहिजे.
मावळ्यांचा इतिहास आचरणातून जगला पाहिजे ! - श्री. आनंदराव काशीद
या प्रसंगी श्री. आनंदराव काशीद म्हणाले, या पावनखिंडीत असंख्य मावळ्यांचे बलिदान झाले आहे. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन इतिहास केवळ स्मरणात न ठेवता तो आपल्या आचरणातून जगला पाहिजे.
उपस्थित मान्यवर - या मोहिमेला मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ. रश्मी कोठावळे, नगरसेवक श्री. महेश कोठावळे, गजापूर (पांढरेपाणी) येथील सरपंच श्री. चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश विभूते, हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, महिला आघाडीच्या शिलाताई माने, हिंदू जागरणच्या जिल्हा सहसंयोजिका डॉ. अश्विनी माळकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ आणि श्री. चारुदत्त पोतदार, उद्योजिका सौ. मनिषा वाडीकर, मलकापूर येथील पुरोहित श्री. सुहास जोशी, ‘मराठा तितुका मेळवावा’चे कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव आणि श्री. प्रसाद कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. आदित्य शास्त्री, श्री. महेंद्र अहिरे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, डॉ. शिल्पा कोठावळे यांच्यासह अनेक मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ आणि परिसरातील शिवप्रेमी उपस्थित होते.
* विशेष
* या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील सरदार कमळोजी साळुंखे यांनी वापरलेली ऐतिहासिक तलवार आणि शिवकालीन पट्टा उपस्थितांना दर्शनासाठी ठेवण्यात आला.
*. ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. अनिश पोतदार यांनी १०७ वेळा रक्तदान केल्याबद्दल श्री. रमेश शिंदे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
‘आई वाघजाई देवी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे’, ‘नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर शिवा काशीद यांचा विजय असो’, ‘नमोः पार्वतीपते हर हर महादेव’ आदी घोषणांनी पावनखिंड परिसर क्षात्रतेजाने दुमदुमून गेला.
Comments
Post a Comment