'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रम खुपिरे येथे उत्साहात संपन्न

 

'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रम खुपिरे येथे उत्साहात संपन्न



कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क 

राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारा 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम करवीर तालुक्यातील खुपिरे येथे उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे ३०० गावांमध्ये वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष संवाद साधत मार्गदर्शन करत असून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत.

खुपिरे, शिंदेवाडी व साबळेवाडी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी, करवीर यांच्या वतीने कृषी दिंडीचे आयोजन करण्यात आले.

कृषी दिंडीद्वारे चिकट सापळे, प्रकाश सापळे, पक्षी थांबे, जीवामृत, दशपर्णी अर्क यांसारख्या पर्यावरणपूरक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली. प्रगतशील शेतकरी दादू ज्योतीराम जांभळे यांच्या भुईमूग प्रक्षेत्रावर 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम प्रत्यक्ष राबविण्यात आला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी गटशेती व नैसर्गिक शेतीचे महत्त्व स्पष्ट केले. उपकृषी अधिकारी संतोष पाटील यांनी दशपर्णी अर्क व जीवामृत तयार करण्याची पद्धत तसेच त्याचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी उर्मिला सरनाईक यांनी जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.

यानंतर पीएमएफएमई योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या किशोर पाटील यांच्या माऊली बेकरीला भेट देण्यात आली. तसेच पीएम श्री विद्यामंदिर, खुपिरे येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास माऊली शेतकरी गटातील शेतकरी, पंचायत समिती सदस्या आशा पाटील, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद सुशांत लवटे, उपसरपंच सागर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम महसूल अधिकारी के. पी. पोवार, पाणी फाउंडेशनच्या नम्रता खानापुरेओंकार सुर्वे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments