विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज- डॉ. भूषण पटवर्धन

 विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज- डॉ. भूषण पटवर्धन 

-'आयुर्वेद फॉर किड्स', 'योग फॉर किड्स' आणि 'जिनोम ते ओंम' पुस्तकांचे प्रकाशन 

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून आयोजन 

कदमवाडी – डॉ. भूषण पटवर्धन यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करताना डॉ. संजय डी. पाटील, डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. माणिकराव साळुंखे, प्रा. रजनीश कामत, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, डॉ. जया कुऱ्हेकर, आशुतोष रामगीर आदी.


कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

लहान मुलांचा पोशाख, आहार आणि बोलण्यात भारत दिसत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव त्यांच्या वर्तनावर वाढत आहे. अशा काळात आपल्या परंपरा आणि संस्कृतीची शिकवण त्यांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज आहे. प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल, असा विश्वास राष्ट्रीय संशोधक आणि शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केला.


सकाळ प्रकाशन आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पटवर्धन लिखित 'आयुर्वेद फॉर किड्स', 'योग फॉर किड्स' आणि 'जिनोम ते ओंम' या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील होते यावेळी  भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम,  शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत, शिवाजी विद्यापीठाचेमाजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अनुवादक डॉ. जया कुऱ्हेकर, आशुतोष रामगीर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.


डॉ. पटवर्धन म्हणाले, आयुर्वेदातील बायोटेक्नॉलॉजी आणि योगाचे महत्त्व समजावून सांगण्याचा या पुस्तकांमधून प्रयत्न केला आहे. पीएच.डी. विद्यार्थ्याच्या संकल्पनेवर व्यापक संशोधन करताना उपनिषदांचा अभ्यास केला. आत्मा, परमात्मा ते जिनोम हा प्रवास समजून घेताना हे पुस्तक आपोआप उलगडत गेले. आयुर्वेदात विश्वातील सर्व घटक परस्परांशी कसे जोडलेले आहेत, तसेच पंचमहाभूतांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.


जागतिक वाचकांना समजेल आणि रुचेल अशा पद्धतीने पुस्तकांची मांडणी केली आहे.  आधुनिक विज्ञानामुळे मोठी प्रगती झाली असली, तरी त्या विज्ञानाच्या मूलतत्त्वांशी आपण जोडलेलो आहोत का, याचा विचार या पुस्तकांत मांडला आहे. विज्ञानाचा शोध म्हणजे सत्याचा शोध असून, त्याचा उपयोग मानवकल्याण, पर्यावरण आणि निसर्गसंवर्धनासाठी व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ही तिन्ही पुस्तके इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रकाशित झाली असून, लवकरच इतर भाषांमध्येही ती उपलब्ध होणार आहेत.


माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, ‘डॉ. पटवर्धन यांच्या तिन्ही पुस्तकांत विश्वकल्याणाचा विचार आहे. पाश्चात्त्य संस्कृतीमुळे झालेले बदल आणि भारतीय संस्कृती यांच्यातील संवाद या पुस्तकांत दिसतो. विज्ञानाचा नैतिकतेने, पर्यावरणसंवर्धनासाठी आणि मानवकल्याणासाठी कसा उपयोग करता येईल, याचा चिकित्सक दृष्टिकोन या पुस्तकांतून मांडला आहे.


कुलगुरु प्रा. रजनीश कामत म्हणाले, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग या पुस्तकांनी दाखवला आहे. परंपरा आणि आधुनिकता यांतील दरी भरून काढण्याचे काम या पुस्तकांनी केले आहे. आजच्या काळात शारीरिक आणि मानसिक ताण वाढत असून, एकाग्रता कमी होत आहे. अशा परिस्थितीत या तिन्ही पुस्तकांचे वाचन मनाला उभारी देणारा अनुभव ठरू शकतो.


आशुतोष रामगीर यांनी स्वागत  व प्रास्ताविक केले. अनुवादक डॉ. जया कऱ्हेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अजिंक्य पंडत यांनी सुत्रसंचालन केले. कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी आभार मानले. डी. वाय. पाटील विद्यापिठाच्या विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी,  विद्यार्थी, पुस्तकप्रेमी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


चौकट

 डॉ. पटवर्धन म्हणाले, आज आपण ज्वालामुखीच्या तोंडावर बसून त्सुनामीची वाट पाहत आहोत, अशी परिस्थिती आहे. ती बदलण्याची गरज आहे. वारकरी परंपरेमुळे आपली संस्कृती टिकून आहे. समाजातील घातक बदल रोखण्यासाठी परंपरा आणि संस्कृतीचे शिक्षण लहानपणापासून दिले पाहिजे. आयुर्वेद, पतंजली, चरक यांसारख्या भारतीय ज्ञानपरंपरेतील विषयांचाही शिक्षणात समावेश व्हावा.



Comments