सामाजिक कार्यकर्ते सरदार राजाराम राणगे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश
कोल्हापूर, दि. १५
सर्वसामान्य जनतेसाठी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे कार्यरत असलेले वाशी येथील सामाजिक कार्यकर्ते सरदार राजाराम राणगे यांनी आज शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपा जिल्हा कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. नामदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, विजय जाधव, राहुल चिकोडे, हंबीरराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राणगे यांच्या समर्थकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडत सरदार राणगे यांच्या सामाजिक कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. राणगे यांनी यापूर्वी धनगर समाज उन्नती मंडळाचे सदस्य, पश्चिम महाराष्ट्र बहुजन दलित सेनेचे अध्यक्ष, शिवबाचा मावळा संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माकोजी राणगे वाशी संस्थेचे अध्यक्ष म्हणून विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
याप्रसंगी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, "व्यसनमुक्ती, गोसंवर्धन, होतकरू विद्यार्थ्यांना मदत, वृद्धाश्रमांना सहकार्य अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे तळागाळातील जनतेशी नाळ जोडून त्यांचे दुःख दूर करण्याचे कार्य सरदार राणगे करत आहेत. अशा सामाजिक कार्यकर्त्याचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत असल्याचा आनंद आहे. भारतीय जनता पार्टी ही अंत्योदयाच्या विचाराने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम करते. राणगे यांच्या सामाजिक कार्याला पक्षाची खंबीर साथ राहील. त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन पक्षवाढीसाठी काम करावे."
आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरदार राणगे यांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हिताचे घेतलेले ऐतिहासिक निर्णय, राज्यातील विविध विकासकामे आणि शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरदार राजाराम राणगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी बोलताना सरदार राणगे म्हणाले, "भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आणि त्यांच्या समस्या सोडविण्याची तळमळ पाहून मी भाजपामध्ये प्रवेश करत आहे. आगामी काळात पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीत सक्रिय सहभाग घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना घरोघरी पोहोचविण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कार्यरत राहीन."
या कार्यक्रमास भिकाजी जाधव, शिवाजी बुवा, डॉ. आनंद गुरव, महेश चौगुले, सुशीला पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रविश पाटील कौलवकर, हंबीरराव पाटील, विकास पाटील, सतीश पाटील, अमित कांबळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment