के.एम.टी. रोजंदारी कर्मचारी सेवेत कायम;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून कर्मचाऱ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त गुड न्युज
के.एम.टी. रोजंदारी कर्मचारी सेवेत कायम;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून कर्मचाऱ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त गुड न्युज
मुंबई दि. २९ सिटी न्यूज नेटवर्क
महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागाकडील रिक्त असणाऱ्या चालक, वाहक पदांवर बदली प्रतीक्षा यादीवरील ज्येष्ठ व विनियमातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली.
याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाबाबत नगरविकास विभागाचे मुख्य सचिव के. एच गोविदराज यांना सूचना दिल्या असून त्यांच्या सहीने शासन निर्णय आज किंवा उद्या निघणार असून के. एम.टी.च्या रोजंदारी कर्मचारी सेवेत कायम झाल्याची माहिती घेतल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
गेले ३० ते ३५ वर्षे रोजंदारी कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार क्षीरसागर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळेच महानगरपालिकेतील आरोग्य विभागाकडील ५०८ रोजंदारी कर्मचारी कायम केले होते. यावेळी काही तांत्रिक त्रुटींमुळे के. एम.टी.तील १५६ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता.
याबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी के.एम.टी. कडील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतही आ. क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला होता.
गेली ३५ वर्षे सेवा करूनही नोकरीत कायम होत नसल्याची खंत रोजंदारी कर्मचाऱ्यांना होती. त्यांना इतक्या वर्षात कोणीच न्याय दिला नाही; परंतु माणुसकीच्या दृष्टीने त्यांना सेवेत कायम करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कर्मचाऱ्यांचे भावी आयुष्य सुधरावे, त्यांना न्याय मिळावा म्हणून सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे आभार मानत असल्याचेही आ. क्षीरसागर यांनी नमूद केले आहे.

Comments
Post a Comment