मार्केट सेस रद्द करण्यासाठी ४ ऑगस्टला कोल्हापुरात राज्यव्यापी व्यापारी परिषद; प्रत्येक जिल्ह्यातून व्यापारी प्रतिनिधी सहभागी होणार

 

 मार्केट सेस रद्द करण्यासाठी ४ ऑगस्टला कोल्हापुरात राज्यव्यापी व्यापारी परिषद; प्रत्येक जिल्ह्यातून व्यापारी प्रतिनिधी सहभागी होणार



कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क 

१९६३ सालच्या कालबाह्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याअंतर्गत आकारल्या जाणाऱ्या मार्केट सेसमुळे व्यापारी आणि ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, व्यापारातील अडचणी वाढत आहेत तसेच दुबार कर आकारणीचा व्यापाऱ्यांना सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापुरात राज्यव्यापी व्यापारी परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे आणि दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष संजीव परीख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्यांनी सांगितले की, जीएसटी लागू करताना अन्नधान्य आणि खाद्यान्न जीएसटीमधून वगळण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र जुलै २०२२ पासून अन्नधान्य, खाद्यान्न आणि गुळावर जीएसटी लागू करण्यात आला. त्याचबरोबर मार्केट सेस आणि व्यवसाय कराचा भुर्दंड आजही व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

मार्केट सेस रद्द करण्यासाठी ४ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यात राज्यस्तरीय व्यापारी मेळावा झाला होता. त्यानंतर २७ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती. मात्र शासनाने चर्चेनंतर महिनाभरात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने बंद मागे घेण्यात आला. त्यानंतरही कोणताही निर्णय झाला नाही. १० ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाने मार्केट सेसचे नवीन दर जाहीर केले, मात्र बाजार समित्यांच्या विरोधानंतर अवघ्या ४८ तासांत त्याला स्थगिती देण्यात आली.

त्यानंतर ५ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र व्यापारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी व्यापार बंद करण्यात आला. त्यानंतर शासनाने समिती स्थापन केली असली तरी मार्केट सेस रद्द करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी नाराजी व्यापारी संघटनांनी व्यक्त केली.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाजार समित्यांना यूजर चार्जेस आकारण्याचा अधिकारही देण्यात आला होता. त्यास विरोध झाल्यानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यूजर चार्जेसच्या निर्णयालाच शासनाने स्थगिती दिली असून इतर ठिकाणी अद्याप प्रश्न कायम आहे.

राज्यस्तरीय व्यापारी परिषदेच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरात ऑनलाईन बैठका तसेच कोल्हापूर जिल्ह्यात तालुकानिहाय व्यापारी मेळावे घेण्यात आले. हुपरी, वडगाव, बांबवडे, जयसिंगपूर, कागल, आजरा, राशिवडे, इचलकरंजी, राधानगरी आदी भागातील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने परिषदेला उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्यातील उर्वरित ३५ जिल्ह्यांतही परिषदपूर्व जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

या परिषदेस चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रा, इंडस्ट्री अँड ट्रेड (कॅमिट), मुंबईचे चेअरमन मोहन गुरनानी, प्रेसिडेंट दिपेन आगरवाल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, दि ग्रेन, राईस अँड ऑईल सीडस् मर्चंटस् असोसिएशन, मुंबईचे अध्यक्ष भिमजी भानूशाली तसेच दि पूना मर्चंटस् चेंबरचे राजेंद्र बांठीया मार्गदर्शन करणार आहेत. राज्यभरातील व्यापारी संघटनांचे पदाधिकारीही परिषदेत सहभागी होऊन आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करणार आहेत.

परिषदेनंतर कोल्हापूरातील लोकप्रतिनिधींना मार्केट सेस रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात येणार असून शासनाने मागणीची दखल न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही व्यापारी संघटनांनी दिला आहे.

व्यापारी संघटनांची भूमिका स्पष्ट करताना, मार्केट सेस आवारासह आवाराबाहेरील शेतमालावरील सेसही पूर्णपणे रद्द करण्यात यावा तसेच स्थानिक संस्था कराप्रमाणे शासनाने बाजार समित्यांना अनुदान देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.

पत्रकार परिषदेला उपस्थित

पत्रकार परिषदेला कॅमिट व कोल्हापूर चेंबरचे मानद सचिव अजित कोठारी, वैभव सावर्डेकर, किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कापडिया, ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय कागले, धन्यकुमार चव्हाण, श्रीनिवास मिठारी, विवेक शेटे, किरण तपकीरे, शाहूपुरी मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो पाटील, मार्केट समितीचे संचालक कुमार अहुजा, राहुल नष्टे, अनिल धडाम, पेठवडगाव किराणा असोसिएशनचे अध्यक्ष अजित होनोले, हुपरी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश इंग्रोळे, रेंदाळ किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, राशिवडे व्यापारी असोसिएशनचे एकनाथ चौगुले, मलकापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश विभुते, कागल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद बोंगाळे, आजरा व्यापारी असोसिएशनचे कपिल नलवडे, राधानगरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश फणसे यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील व्यापारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments