रिलायन्सच्या राईज वर्ल्डवाईडसोबत भारताची उदयोन्मुख क्रिकेटपटू गुणालन कमालिनीची भागीदारी

रिलायन्सच्या राईज वर्ल्डवाईडसोबत भारताची उदयोन्मुख क्रिकेटपटू गुणालन कमालिनीची भागीदारी



 १७ वर्षीय कमालिनी राईज वर्ल्डवाईडशी संलग्न होणारी पहिली महिला खेळाडू; रोहित, बुमराह आणि सूर्यकुमार यांच्या यादीत समावेश


मुंबई, १५ सिटी न्यूज नेटवर्क 

रिलायन्स समूहाची कंपनी आणि भारतातील आघाडीची स्पोर्ट्स, लाइफस्टाइल व एंटरटेनमेंट कंपनी राईज वर्ल्डवाईड (RISE Worldwide) हिने देशातील सर्वाधिक आश्वासक युवा महिला क्रिकेटपटू गुणालन कमालिनी हिच्यासोबत भागीदारी केली आहे. या करारानंतर कमालिनीचा समावेश राईज वर्ल्डवाईडच्या क्रिकेटपटूंच्या प्रतिष्ठित समूहात झाला असून, या समूहात यापूर्वीच रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि साई सुदर्शन यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू आहेत. या भागीदारीमुळे क्रीडा क्षेत्रातील नव्या प्रतिभावान खेळाडूंना घडविण्याच्या राईज वर्ल्डवाईडच्या वचनबद्धतेला आणखी बळ मिळाले आहे.



१७ वर्षीय कमालिनी ही राईज वर्ल्डवाईडशी संलग्न होणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. राईज वर्ल्डवाईड तिची विशेष व्यावसायिक (एक्सक्लुझिव्ह कमर्शियल) आणि टॅलेंट मॅनेजमेंट भागीदार म्हणून काम करणार आहे. ब्रँड एंडोर्समेंट, धोरणात्मक भागीदारी, सार्वजनिक उपस्थिती (अपिअरन्स), लायसेंसिंग, डिजिटल कंटेंट तसेच दीर्घकालीन ब्रँड उभारणीची संपूर्ण जबाबदारी राईज वर्ल्डवाईड सांभाळणार असून, त्यामुळे कमालिनीला तिच्या खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येणार आहे.


या भागीदारीबाबत राईज वर्ल्डवाईडचे प्रमुख निखिल बारदिया म्हणाले, “राईज वर्ल्डवाईड परिवारात कमालिनीचे स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ती एक विलक्षण युवा प्रतिभा असून, आपल्या कामगिरीतून तिने सर्वोच्च स्तरावर यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास, जिद्द आणि महत्त्वाकांक्षा आधीच सिद्ध केली आहे. आमच्या टॅलेंट रोस्टरमध्ये सामील होणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू असल्याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. मैदानाबाहेरील योग्य संधी उपलब्ध करून देत तिच्या प्रवासाला अधिक सक्षम बनविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, जेणेकरून ती मैदानावरील यशावर अधिक लक्ष केंद्रित करू शकेल.”


राईज वर्ल्डवाईडशी जोडल्या गेल्याबद्दल आनंद व्यक्त करताना गुणालन कमालिनी म्हणाली, “राईज वर्ल्डवाईडचा भाग बनल्याचा मला खूप आनंद आहे. भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंसोबत त्यांनी काम केले आहे आणि आता त्या संघाचा भाग होण्याची संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आहे. सध्या माझे संपूर्ण लक्ष क्रिकेटपटू म्हणून स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करण्यावर आणि मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा सर्वोत्तम उपयोग करण्यावर आहे. माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी राईजसारखी सक्षम टीम माझ्यासोबत असणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि या नव्या प्रवासाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”


कमालिनीचा क्रिकेटमधील प्रवास अत्यंत वेगाने आणि सातत्यपूर्ण प्रगती करणारा राहिला आहे. तिने प्रथम तमिळनाडूच्या अंडर-१५ (U-15) संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यानंतर राज्याच्या अंडर-१९ (U-19) संघात स्थान मिळवले. या संघासोबत तिने टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर ती भारतीय अंडर-१९ महिला संघाची सदस्य बनली. या संघाने २०२५ च्या सुरुवातीला आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक जिंकला. या स्पर्धेत कमालिनी सर्वाधिक धावा करणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाची फलंदाज ठरली.


याच वर्षी, अवघ्या १६ व्या वर्षी तिने इतिहास रचला. महिला प्रीमियर लीग (WPL) करार मिळवत मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणारी ती सर्वात युवा खेळाडू ठरली. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीच्या जोरावर २०२५ च्या अखेरीस श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेसाठी तिची प्रथमच भारतीय वरिष्ठ संघात निवड झाली आणि वयाच्या १७ व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.


तिच्या उत्कृष्ट क्षमतेची दखल घेत मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएल २०२६ (WPL 2026) मेगा लिलावापूर्वी कायम राखलेल्या (रिटेन केलेल्या) पाच खेळाडूंमध्ये तिचा समावेश केला. अलीकडेच २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी (Asian Games) भारतीय संघातही तिची निवड झाली असून, भारतातील सर्वाधिक आश्वासक युवा क्रिकेटपटूंमध्ये तिचे वाढते स्थान यामुळे अधोरेखित झाले आहे.


कमालिनीचा राईज वर्ल्डवाईड परिवारात झालेला समावेश हा भारतातील सर्वोत्तम क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. धोरणात्मक टॅलेंट मॅनेजमेंट आणि दीर्घकालीन ब्रँड उभारणीचा प्रभावी संगम साधत, ही संस्था खेळाडूंना मैदानावर आणि मैदानाबाहेरही त्यांची सर्वोच्च क्षमता गाठण्यासाठी सक्षम करण्यावर भर देत आहे.

Comments