केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाविरोधात रंगकर्मींचा एल्गार; ठिय्या आंदोलनातून तीव्र विरोध, न्यायालयात जाण्याचा निर्णय
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाविरोधात रंगकर्मींचा एल्गार; ठिय्या आंदोलनातून तीव्र विरोध, न्यायालयात जाण्याचा निर्णय
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महानगरपालिकेने संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खासगी संस्थेला चालविण्यास देण्याबाबत २० जुलै २०२६ रोजी केलेल्या ठरावाच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील रंगकर्मी, नाट्यप्रेमी, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध घटक, शाहूप्रेमी आणि समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून नाट्यगृहाच्या खासगीकरणाविरोधातील तीव्र लोकभावना व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्था, संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवत खासगीकरणाच्या निर्णयाला स्पष्ट विरोध नोंदविला. आंदोलनकर्त्यांनी राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेले हे नाट्यगृह केवळ एक वास्तू नसून कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असल्याचे सांगत त्याचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी केली.
आंदोलनादरम्यान खासगीकरणाची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा करत या प्रस्तावाला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णयही घेण्यात आला. रंगकर्मींच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून त्याची प्रतही प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे.
रंगकर्मींच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, हा लढा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधात नसून कोल्हापूरच्या सांस्कृतिक अस्मितेचे संरक्षण आणि संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे सार्वजनिक स्वरूप कायम राखण्यासाठी आहे. प्रशासनाने राबविलेल्या खासगीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध असून, ठराव बिनशर्त मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. मागणीची दखल न घेतल्यास अधिक व्यापक आणि तीव्र लोकआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिल्लीहून दूरध्वनीवरून आंदोलनाला पाठिंबा दर्शवत खासगीकरणाला विरोध व्यक्त केला. तसेच आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही दूरध्वनीवरून आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला.
या आंदोलनाला कोल्हापूरसह इचलकरंजी, सांगली, सातारा, कराड, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग, चंदगड, गडहिंग्लज, रत्नागिरी, बेळगाव आदी भागांतील रंगकर्मी संघटना, शाहूप्रेमी आणि विविध सांस्कृतिक संस्थांनी दूरध्वनी व पत्राद्वारे पाठिंबा दर्शविला. गरज पडल्यास कोल्हापुरात येऊन खासगीकरण रोखण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली.
आंदोलनात सुनील घोरपडे, आनंद काळे, किरणसिंह चव्हाण, प्रसाद जमदग्नी, रोहन घोरपडे, हर्षल सुर्वे, इंद्रजीत सावंत, विजय देवणे, चंद्रकांत यादव, राजेश लाटकर, सुनील मोदी, प्रवीण केसरकर, अमर समर्थ, सचिन चव्हाण, विनायक फाळके, संदीप देसाई, इंद्रजीत बोंद्रे, वसंतराव मुळीक, ॲड. इंद्रजीत चव्हाण, राहुल इंगवले, उमेश पवार, चंद्रकांत पाटील, सुनिता पाटील यांच्यासह कोल्हापूरातील २०० हून अधिक चित्रकर्मी, रंगकर्मी, नृत्यकर्मी, संगीत क्षेत्रातील कलाकार आणि कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Post a Comment