सेवावस्तीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळाला हातभार; जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटी व ड्रीम टीम फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम
सेवावस्तीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळाला हातभार; जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटी व ड्रीम टीम फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम
कोल्हापूर १२ सिटी न्यूज नेटवर्क
सामाजिक बांधिलकी जपत सेवावस्तीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटी आणि ड्रीम टीम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर सेवा वस्ती येथील स्वराज्य हॉलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात ५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वह्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्पेशल ऑफिसर श्री. सुरेश खांडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व जायंट्स प्रार्थनेने झाली. त्यानंतर राष्ट्रसेविका, समितीच्या सौ. विजयाताई शिरगोपीकर यांनी विद्यार्थ्यांकडून पाढे, संस्कारगीते आणि बडबडगीते सादर करून घेतली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीच्या संस्थापिका व समन्वयक सौ. बबीताताई जाधव, अध्यक्ष श्री. तानाजी पाटील, कार्यवाह सौ. कमलताई पाटील, स्पेशल ऑफिसर श्री. सुरेश खांडेकर, श्री. डावरे, सौ. वैशाली कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पेशल ऑफिसर श्री. सुरेश खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, चांगले संस्कार आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्ष श्री. तानाजी पाटील यांनी शिस्त, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी आपले ध्येय गाठू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.
ड्रीम टीम फाउंडेशनच्या वतीने अर्पिता दत्तात्रय राऊत, श्रुती प्रमोद चौगुले, श्रेया प्रमोद चौगुले आणि आँचल विनोद कटारे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेत समाजसेवेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीवही तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन सौ. शुभदा मोहन कामत यांनी केले. सेवावस्तीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन किंवा इतर स्वरूपात मदत करू इच्छिणाऱ्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी ताकद असल्याचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरला.

Comments
Post a Comment