दुथडी भरून वाहतेय पंचगंगा; तरीही शहराला एक दिवसाआड पाणी? शिवसेनेचे किशोर घाटगे यांचा महापालिकेला सवाल
दुथडी भरून वाहतेय पंचगंगा; तरीही शहराला एक दिवसाआड पाणी? शिवसेनेचे किशोर घाटगे यांचा महापालिकेला सवाल
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले होते. मात्र, सध्या काळम्मावाडी धरण सुमारे 50 टक्के, तर राधानगरी धरण 90 टक्क्यांहून अधिक भरले आहे. याशिवाय चार दिवसांपूर्वीच राधानगरी धरणातून 1,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून पंचगंगा नदीही दुथडी भरून वाहत आहे. अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांना अद्याप एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याबद्दल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
घाटगे म्हणाले की, सध्या जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून शिंगणापूर बंधाऱ्यावरूनही पाणी वाहत आहे. विशेषतः सी आणि डी वॉर्डाला पाणीपुरवठा करणाऱ्या या बंधाऱ्यावर मुबलक पाणी उपलब्ध असताना त्या भागातील नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे "उशाला पंचगंगा आणि घशाला कोरडेपणा" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाणीटंचाईच्या शक्यतेमुळे लागू करण्यात आलेले एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन आता तातडीने मागे घेऊन शहरात दररोज नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, असे आवाहनही किशोर घाटगे यांनी केले आहे.
.jpeg)

Comments
Post a Comment