पुरी रथयात्रेत रिलायन्स फाउंडेशनचा सेवासंकल्प; अन्नदान, पिण्याचे पाणी आणि सुरक्षिततेवर भर
• १५ ते २७ जुलैदरम्यान अन्नसेवा, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वयंसेवकांची नियुक्ती
• ९० पोलीस मदत केंद्रे, तंत्रज्ञान आणि स्वच्छता मोहिमेमुळे भाविकांचा प्रवास अधिक सुलभ
पुरी, १५ सिटी न्यूज नेटवर्क
भगवान जगन्नाथ यांच्या जगप्रसिद्ध रथयात्रेत यंदा लाखो भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनने व्यापक सेवा अभियान सुरू केले आहे. १५ ते २७ जुलैदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत भाविकांसाठी मोफत सात्त्विक भोजन, सुरक्षित पिण्याचे पाणी, पोलीस मदत केंद्रे आणि स्वच्छतेसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच रथयात्रेदरम्यान सेवा देणारे स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही विशेष सहाय्य दिले जाणार आहे.
रिलायन्स फाउंडेशन यापूर्वीही पुरी रथयात्रेदरम्यान विविध सेवा उपक्रमांत सहभागी झाले आहे. यंदा या अभियानाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी सांगितले की, भाविक आणि त्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींची सेवा करणे, हेच भगवान जगन्नाथांच्या सेवेचे एक स्वरूप आहे.
रिलायन्स फाउंडेशनच्या माहितीनुसार, या अभियानाअंतर्गत भाविकांसाठी मोफत सात्त्विक भोजन आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ५० किलोमीटरहून अधिक लांबीच्या प्रमुख रथयात्रा मार्गावरील सुमारे ९० पोलीस मदत केंद्रांना सहकार्य करण्यात येत आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या सुमारे १,००० पोलीस कर्मचाऱ्यांना शिफ्टनिहाय पिण्याचे पाणी, ओआरएस, हलका अल्पोपहार आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय स्वयंसेवक भाविकांना आवश्यक मदत करतील, तर जीआयएस-आधारित डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सेवा कार्यांचे अधिक प्रभावी समन्वयन केले जाणार आहे.
अनंत अंबानी म्हणाले, “पुरी रथयात्रा हा कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा उत्सव आहे. भाविक, पोलीस कर्मचारी आणि सेवेत कार्यरत प्रत्येक व्यक्तीची सेवा करण्याची संधी मिळणे, हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. लोकांची सेवा हाच भगवान जगन्नाथांच्या सेवेचा खरा मार्ग आहे.”
रिलायन्स फाउंडेशनने सांगितले की, या उपक्रमांचा उद्देश सुमारे २० लाखांहून अधिक भाविकांसाठी रथयात्रा अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक संस्थांना सहकार्य करणे हा आहे.

Comments
Post a Comment