१२ वर्षांनंतर कोल्हापुरात दक्षिण भारत जैन सभेचे १०४ वे नैमित्तिक अधिवेशन; २ ऑगस्ट रोजी
कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क
दक्षिण भारत जैन सभेचे १०४ वे नैमित्तिक अधिवेशन रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये उत्साहात पार पडणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर हे अधिवेशन कोल्हापुरात होत असल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातील जैन समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
सन १८९९ मध्ये स्थापन झालेली दक्षिण भारत जैन सभा ही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जैन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक विकासासाठी कार्यरत असलेली अग्रगण्य संस्था आहे. या अधिवेशनात गेल्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा, आगामी वर्षातील कार्ययोजना, समाजहिताच्या विविध योजना तसेच भावी वाटचालीची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
अधिवेशनास कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सभेचे अध्यक्ष भालचंद्र विरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्कार, शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग या पंचसूत्रीवर सभेचे कार्य सुरू असून, जैन नेक्स्ट (जैन चेंबर ऑफ कॉमर्स) आणि सहकार समिती या नव्या उपक्रमांद्वारे समाजहिताचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोल्हापूरशी दक्षिण भारत जैन सभेचे ऐतिहासिक आणि भावनिक नातेही अधोरेखित करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज यांनी १९०१ साली जैन बोर्डिंगसाठी जागा बहाल केल्यामुळे या संस्थेच्या इतिहासात कोल्हापूरला विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
या अधिवेशनास महाराष्ट्र व कर्नाटकातील जैन समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सभेचे ट्रस्टी आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर), अध्यक्ष भालचंद्र पाटील तसेच केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले.

Comments
Post a Comment