आरोग्य जनजागृतीची प्रभावी वाटचाल; मुक्ताई कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये 'ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती कार्यशाळा
कोल्हापूर (तिटवे) ११ सिटी न्यूज नेटवर्क
महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि ग्रामीण भागात आरोग्यविषयक माहितीचा प्रसार करणे, ही काळाची गरज ओळखून शहीद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुक्ताई कॉलेज ऑफ नर्सिंग, तिटवे यांच्या वतीने आशा वर्कर्स व आशा सुपरवायझर्ससाठी "ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती, लवकर निदान व प्रतिबंध" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत ऑन्कोकेअर सेंटरचे ब्रेस्ट कॅन्सरतज्ज्ञ डॉ. निलेश धामणे यांनी स्तन कर्करोगाची कारणे, सुरुवातीची लक्षणे, स्व-तपासणीची पद्धत, वेळेवर निदानाचे महत्त्व आणि उपचारातील आधुनिक तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. स्तन कर्करोग लवकर ओळखल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, त्यामुळे महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी एमएसएमई प्रशिक्षक संदीप पवार यांनी आरोग्य जनजागृती मोहिमेत आशा वर्कर्सची भूमिका, प्रभावी संवादकौशल्य आणि समाजातील महिलांमध्ये आरोग्यविषयक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेले नेतृत्वगुण याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधुरा सुनील पाटील, वंदना गणपती खोत आणि द्रौपदी रविंद्र कांबळे या आशा सुपरवायझर्सचा सन्मान करून त्यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहीद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले. यावेळी मुक्ताई कॉलेजच्या प्राचार्या सरिता धनवडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी परबकर यांनी केले, तर विशाल कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेस राधानगरी, कागल व भुदरगड तालुक्यातील मोठ्या संख्येने आशा सेविका व आशा सुपरवायझर्स उपस्थित होत्या.

Comments
Post a Comment