भर पावसातही फुटबॉलप्रेमींचा जल्लोष; मिरजकर तिकटीवर विश्वचषक अंतिम सामन्याचा थरार

 

भर पावसातही फुटबॉलप्रेमींचा जल्लोष; मिरजकर तिकटी येथे विश्वचषक अंतिम सामन्याचा थरार 



कोल्हापूर २० सिटी न्यूज नेटवर्क 

फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी रविवारी मध्यरात्री कोल्हापूरातील मिरजकर तिकटी येथे फुटबॉलप्रेमींची अभूतपूर्व गर्दी उसळली. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या भव्य एलईडी स्क्रीनवर अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही छत्र्या आणि रेनकोटसह हजारो फुटबॉल शौकिनांनी उपस्थित राहून सामन्याचा आनंद लुटला.

रविवारी रात्री साडेअकरापासूनच मिरजकर तिकटी परिसरात फुटबॉल चाहत्यांची गर्दी होऊ लागली. मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण परिसर खचाखच भरला होता. अनेकांनी अर्जेंटिना संघाची जर्सी परिधान करून आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा दर्शविला. कृष्णराज महाडिक यांनीही अर्जेंटिनाची जर्सी परिधान करून उपस्थित चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला. यावेळी चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सामन्यादरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र फुटबॉलप्रेमींच्या उत्साहात कोणतीही कमी जाणवली नाही. छत्र्या आणि रेनकोटच्या संरक्षणाखाली चाहत्यांनी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जल्लोष केला. संपूर्ण सामना अत्यंत चुरशीचा झाला. स्पेनच्या वेगवान आक्रमणांना अर्जेंटिनाने भक्कम बचावाने प्रत्युत्तर दिले. अखेर स्पेनने १-० अशा फरकाने विजय मिळवत दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले.

पराभवानंतरही अर्जेंटिना समर्थकांनी आपल्या संघाला दाद दिली, तर स्पेनच्या विजयाचेही उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. पहाटेपर्यंत फुटबॉलप्रेमींनी मिरजकर तिकटीवर ठिय्या देत विश्वचषक अंतिम सामन्याचा अविस्मरणीय अनुभव घेतला.

भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सार्वजनिक प्रक्षेपण उपक्रमाला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, भर पावसातही फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

Comments