केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगी व्यवस्थापनास रंगकर्मींचा ठाम विरोध
| संग्रहित |
कोल्हापूर 30 सिटी न्यूज नेटवर्क
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाबाबत कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या स्पष्टीकरणानंतरही रंगकर्मींचा विरोध कायम असून, खासगी व्यवस्थापन अथवा पीपीपी (Public Private Partnership) पद्धतीने नाट्यगृहाचे संचालन करण्यास त्यांचा ठाम विरोध असल्याचे समस्त रंगकर्मींच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.
रंगकर्मींच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेने तांत्रिक सेवा, स्वच्छता आणि सुरक्षा या बाबींसाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय स्पष्ट केला असला तरी, या व्यवस्थेची अंमलबजावणी, आर्थिक व्यवहार आणि एजन्सीला दिले जाणारे अधिकार याबाबत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. खासगी एजन्सीच्या माध्यमातून नाट्यगृहाच्या उत्पन्नाचे व्यवस्थापन होणार असल्यास तो प्रत्यक्षात खासगीकरणाचाच प्रकार असल्याचा त्यांचा आरोप आहे.
रंगकर्मींचे म्हणणे आहे की, गेली दोन वर्षे त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी आणि विकासासाठी सकारात्मक सूचना देत सातत्याने सहकार्य केले आहे. नाट्यगृह अधिक सक्षम आणि कलाकाराभिमुख व्हावे हीच त्यांची भूमिका असून, कोणत्याही प्रकारे ते खासगी संस्थांच्या ताब्यात जाऊ नये, अशी त्यांची मागणी आहे.
महानगरपालिकेने या संपूर्ण प्रकरणावर लेखी स्पष्टीकरण द्यावे तसेच आयुक्त, महापौर, पदाधिकारी, रंगकर्मी आणि प्रसारमाध्यमांची संयुक्त जाहीर बैठक आयोजित करावी, अशी मागणीही प्रसिद्धीपत्रकात करण्यात आली आहे. यापुढेही खासगी व्यवस्थापन अथवा खासगीकरणाच्या कोणत्याही प्रयत्नांना तीव्र विरोध सुरूच राहील, असा इशाराही रंगकर्मींनी दिला आहे.

Comments
Post a Comment