राजर्षी शाहू स्मारक भवनात 'हम साथ साथ हैं' कराओके संगीत मैफल सोमवारी

 

राजर्षी शाहू स्मारक भवनात 'हम साथ साथ हैं' कराओके संगीत मैफल सोमवारी



कोल्हापूर १२ सिटी न्यूज नेटवर्क 

तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आलेला 'हम साथ साथ हैं' हा बहुचर्चित कराओके संगीत कार्यक्रम अखेर सोमवार, दि. १३ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे रंगणार आहे. कलासक्त (एनडी स्टुडिओ) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून करवीरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

यापूर्वी हा कार्यक्रम राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आला होता. मात्र, नूतनीकरणानंतरच्या सभागृहातील ध्वनी व्यवस्थेतील (साऊंड सिस्टीम) तांत्रिक बिघाड तसेच सभागृहातील गळतीमुळे कार्यक्रम अर्धवट थांबवून रद्द करावा लागला होता. या घटनेची शहरात मोठी चर्चा झाली होती.

यानंतर संबंधित यंत्रणेकडून पुण्याहून अभियंता बोलावून साऊंड सिस्टीमची सखोल तपासणी व चाचणी करण्यात आली. तसेच सभागृहातील गळती दूर करून आवश्यक तांत्रिक त्रुटींची पूर्तता करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाच्या संयोजकांना नव्याने कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

आता सर्व तांत्रिक बाबी सुरळीत झाल्यानंतर हा बहुप्रतीक्षित कराओके संगीत कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्यात आला आहे. दर्जेदार हिंदी-मराठी गीतांचा सुरेल आस्वाद घेण्यासाठी संगीतप्रेमींनी या मोफत कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Comments