गुरू समर्पण चातुर्मासाचा भव्य मंगल प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न
कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क
श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, गुजरी यांच्या वतीने आयोजित "गुरू समर्पण चातुर्मास" अंतर्गत परमपूज्य आचार्यदेव अभयशेखर सुरिश्वरजी महाराजसाहेब यांचे शिष्य, पूज्य पंन्यास श्री जयभानूशेखर विजयजी महाराजसाहेब यांचा आगामी चातुर्मास कोल्हापूर गुजरी श्रीसंघामध्ये होत असून, त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य मंगल प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
बिंदू चौक येथून शाही थाटात प्रारंभ झालेल्या मंगल प्रवेश मिरवणुकीत आकर्षक स्वागत कमानी, देखणे चित्ररथ, पारंपरिक वाद्यपथके, महिला मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग तसेच विविध धार्मिक व सामाजिक मंडळांची उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. पुणे, मुंबई, अहमदाबाद, कराड, ईश्वरपूर, इचलकरंजी तसेच इतर विविध शहरांतून मोठ्या संख्येने भाविक या मंगल सोहळ्यासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झाले होते.
मंगल प्रवेश मिरवणूक बिंदू चौक, शिवाजी पुतळा मार्गे श्री गुजरी जैन मंदिरात पोहोचली. तेथे श्री जिनेंद्र भगवानांचे दर्शन घेतल्यानंतर सर्व भाविक मरुधर भवन येथे एकत्रित झाले. येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात आगामी चातुर्मासातील विविध धार्मिक आराधना, प्रवचने, तप, स्वाध्याय, भक्ती कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली. पूज्य पंन्यास श्री जयभानू विजयजी महाराजसाहेब यांच्या पावन सान्निध्यात पुढील चार महिन्यांत विविध धार्मिक व आध्यात्मिक आराधनांचा लाभ भाविकांना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या मंगल प्रवेश सोहळ्यास श्री गुजरी जैन श्रीसंघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र ओसवाल, उपाध्यक्ष श्री राजेश ओसवाल, सचिव श्री उत्तम ओसवाल, तसेच श्री बाबूलालजी रामसिना, श्री दिलीप ओसवाल, श्री अरविंद गांधी, श्री दिलीप रायगांधी, श्री राजू ओसवाल, ईश्वर परमार यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, महिला मंडळ, युवक मंडळ, स्वयंसेवक, समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि हजारो भाविक उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने करण्यात आले. ट्रस्टचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि समाजबांधवांच्या सहकार्यामुळे गुरू समर्पण चातुर्मासाचा हा मंगल प्रवेश सोहळा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात दिमाखात संपन्न झाला.


Comments
Post a Comment