एआय डिजिटल फोटोग्राफी तंत्रज्ञानावर फोर्टी प्लस कॅप्चरिंग मास्टर्स ग्रुपची कार्यशाळा- पंचक्रोशीतील फोटोग्राफरानी घेतला लाभ .
एआय डिजिटल फोटोग्राफी तंत्रज्ञानावर फोर्टी प्लस कॅप्चरिंग मास्टर्स ग्रुपची कार्यशाळा- पंचक्रोशीतील फोटोग्राफरानी घेतला लाभ .
कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क
फोर्टी प्लस कॅप्चरिंग मास्टर्स फोटोग्राफी ग्रुप, कोल्हापूर यांच्या वतीने आधुनिक 'एआय डिजिटल फोटोग्राफी' या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. छायाचित्रण क्षेत्रात वेगाने होत असलेल्या तांत्रिक बदलांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यशाळेला शहर व पंचक्रोशीतील अनेक हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेत एआय प्रमोटिंग इंजिनिअरिंगचे तज्ज्ञ दिलीप गोटे यांनी एआयच्या साहाय्याने छायाचित्रांचे संपादन, गुणवत्ता वृद्धी, सर्जनशील निर्मिती, वेळेची बचत तसेच आधुनिक डिजिटल फोटोग्राफीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे एआय टूल्सचा वापर समजावून सांगितल्याने उपस्थितांना नव्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळाली.
धावत्या आणि स्पर्धात्मक युगात फोटोग्राफी क्षेत्रात स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना उपस्थित छायाचित्रकारांनी कार्यशाळेचे कौतुक केले आणि अशा उपयुक्त उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल आळतेकर, शरद कोळेकर, सागर चव्हाण, अमर पवार, विकास पाटील तसेच सम्मेद मल्टिमीडियाचे सुहास मुदूगडे यांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन करून भविष्यातही अशा तंत्रज्ञानाधारित कार्यशाळा आयोजित करण्याची मागणी केली.

Comments
Post a Comment