दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद – कोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद – कोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन
कोल्हापूर, दि. २२ सिटी न्यूज नेटवर्क
दिल्ली येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार व पोलिसांकडून झालेल्या कथित दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब (ॲड. प्रकाश) आंबेडकर यांच्या आदेशानुसार दि. २३ जुलै २०२६ रोजी "महाराष्ट्र बंद" ची हाक देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी, युवक, शेतकरी, कामगार, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, सराफ व्यावसायिक, चेंबर ऑफ कॉमर्स, रिक्षा-टॅक्सी संघटना, ट्रान्सपोर्ट संघटना, विविध सामाजिक संस्था, युवक व विद्यार्थी संघटना, सर्व राजकीय पक्ष तसेच संविधानवादी विचारांचे सर्व घटक यांनी महाराष्ट्र बंदमध्ये उत्स्फूर्त व शांततापूर्ण सहभाग नोंदवावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी, कोल्हापूरच्या वतीने करण्यात येत आहे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना आपले प्रश्न मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. विद्यार्थ्यांवर बळाचा वापर होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, त्याच्या निषेधार्थ हा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. व रॅलीच्या माध्यमातून कोल्हापूर बंदचे आव्हान करण्यात येणार आहे
वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी सकाळी ठीक ९.३० वाजता छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, कोल्हापूर येथे उपस्थित राहावे.
त्यानंतर पुढील मार्गाने शांततापूर्ण रॅली काढण्यात येईल:
शाहू समाधी स्थळ → दसरा चौक → विनोद कॉर्नर → दाभोळकर कॉर्नर → एस.टी. स्टँड → राजारामपुरी → बागल चौक → उमट टॉकीज चौक → रिलायन्स मॉल → दसरा चौक
रॅलीनंतर दसरा चौक येथे निषेध सभा आयोजित करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदविणारे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येणार आहे.
कोल्हापूरकरांनी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून, कोणताही अनुचित प्रकार न घडू देता, शांततापूर्ण, लोकशाही व संविधानिक मार्गाने महाराष्ट्र बंद यशस्वी करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
"विद्यार्थ्यांवर लाठीमार नव्हे, न्याय हवा!"
"लोकशाहीत संवाद हवा, दडपशाही नको!"
"आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र या – महाराष्ट्र बंद यशस्वी करा!"

Comments
Post a Comment