'प्रत्येक वारी कर्तव्याची वारी' उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 'प्रत्येक वारी कर्तव्याची वारी' उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदवाळ वारीत नागरिक कर्तव्यांची जनजागृती; विविध मान्यवरांनी भेटी सह दिल्या शुभेच्छा 




कोल्हापूर 28 सिटी न्यूज नेटवर्क 

प्रत्येक  वारी ही केवळ भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा महोत्सव नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. या भावनेतून प्रसार माध्यम समूहाने राबविलेल्या "प्रत्येक वारी कर्तव्याची वारी" या अभिनव जनजागृती उपक्रमाला यंदाच्या कोल्हापूर–पंढरपूर पारंपरिक नंदवाळ आषाढी दिंडीत वारकरी, भाविक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



पौराणिक आणि अध्यात्मिक परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदवाळ येथे कोल्हापूरहून निघालेल्या आषाढी दिंडीत लाखो वारकरी "विठ्ठल... विठ्ठल..." आणि "ज्ञानोबा-तुकाराम" यांच्या गजरात सहभागी झाले होते. या भक्तिमय वातावरणात विविध सामाजिक संस्था व संघटनांनी फराळ वाटप, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबविले. त्यामध्ये प्रसार माध्यम समूहाचा "प्रत्येक वारी कर्तव्याची वारी" हा माहिती व जनजागृती स्टॉल विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.



या स्टॉलच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या ११ मूलभूत नागरिक कर्तव्यांची माहिती वारकऱ्यांना देण्यात आली. धार्मिक यात्रा, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये स्वच्छता राखणे, वाहतुकीचे नियम पाळणे, शिस्त आणि संयम राखणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, पर्यावरण संवर्धन करणे तसेच जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिक पालन करणे, असा संदेश देण्यात आला. अनेक वारकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा जनजागृतीची गरज व्यक्त केली.

यावेळी प्रसार माध्यम समूहाचे प्रमुख प्रताप पाटील म्हणाले, "आषाढी, कार्तिकी वारी असो किंवा कोणताही धार्मिक, सामाजिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, श्रद्धेबरोबरच नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांची जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. 'प्रत्येक वारी कर्तव्याची वारी' हा उपक्रम राज्यभर पोहोचविण्याचा आमचा संकल्प असून, भविष्यात त्याची व्याप्ती अधिक व्यापक करण्यात येणार आहे. आज वारकरी आणि भाविकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच प्रेरणादायी आहे."या उपक्रमादरम्यान वारणा उद्योग समूहाच्या वतीने भाविकांना विशेष सवलत कूपनचे वाटप करण्यात आले. तसेच या उपक्रमासाठी वारणा उद्योग समूह आणि महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्टॉलला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. यामध्येकॉंग्रेस नेते  आमदार सतेज . पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, वाहतूक पोलीस अधिकारी नंदकुमार तसेच कला, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा समावेश होता. उपस्थितांनी भविष्यात या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आश्वासन देत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.


धार्मिक आणि अध्यात्मिक सोहळ्यांमधून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा "प्रत्येक वारी कर्तव्याची वारी" हा उपक्रम कोल्हापूरच्या समृद्ध समाजप्रबोधन परंपरेत मोलाची भर घालत असून, नागरिक कर्तव्यांविषयी व्यापक जनजागृती करण्यासाठी तो प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली .

Comments