कोल्हापुरात दररोज पाणीपुरवठा सुरू करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा
कोल्हापूर ०७ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात तातडीने दररोज पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात घाटगे यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण भरून विसर्ग सुरू आहे, तर काळम्मावाडी धरणही समाधानकारक पातळीवर पोहोचले असून त्यातूनही विसर्ग सुरू करण्यात आला आहे. अशी परिस्थिती असतानाही महानगरपालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरूच ठेवला आहे, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पूर्वी ६० टक्के काळम्मावाडी धरण भरल्यानंतर दररोज पाणीपुरवठा सुरू करण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र आता ७५ टक्के पाणी साठा झाल्यानंतरही भूमिका बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याने, कोणताही मुहूर्त न पाहता तत्काळ अखंडित दररोज पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासोबतच पाणीपुरवठा विभागातील कारभार, कथित अनियमित कनेक्शन, पाणी बिल वाटपातील गोंधळ आणि शहरातील विविध भागांतील मोठ्या प्रमाणावरील पाणीगळती याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पाणीपुरवठा खात्याने या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही किशोर घाटगे यांनी दिला आहे. यावेळी नगरसेवक आशिकीन आजगेकर ,पूजा आडदांडे राजीव जाधव ,रियाज बागवान आदी उपस्थित होते

Comments
Post a Comment