श्रावणाच्या पावन पर्वात विद्यार्थ्यांचे ‘अखंड ग्रंथपारायण'

 श्रावणाच्या पावन पर्वात विद्यार्थ्यांचे ‘अखंड ग्रंथपारायण' 



विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती, एकाग्रता आणि सकारात्मक विचार रुजविण्याचा अभिनव उपक्रम.......

कोल्हापूर, दि. २४ सिटी न्यूज नेटवर्क 

 येथील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित, मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या प्रशालेत श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंदिरांमध्ये ज्याप्रमाणे धार्मिक ग्रंथांचे पारायण केले जाते, त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, एकाग्रता, चिंतनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी निर्माण व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयात अभिनव पद्धतीने ‘ अखंड ग्रंथपारायण’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.



या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सुप्रसिद्ध प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या पुस्तकाबरोबर , अवांतर वाचनाचे एक तास सामूहिक वाचन केले. महाविद्यालयातील संगणक प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी शांत, एकाग्र वातावरणात पुस्तकाचे वाचन केले. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापराच्या काळात विद्यार्थ्यांना काही काळ पुस्तकाच्या सहवासात नेऊन ‘वाचन हीच खरी साधना’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना प्रा सुषमा पाटील यांनी सांगितले की, “श्रावणात जसे मन एकाग्र करून ग्रंथाचे पारायण केले जाते, त्याच भावनेने विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे वाचन करावे. वाचनातून ज्ञान मिळते, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते.”

तुकाराम मुंढे यांच्या जीवनातील अनुभव, प्रशासकीय कार्यशैली, शिस्त, ध्येयवेड आणि सामाजिक बांधिलकी यांचा परिचय विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या माध्यमातून झाला. त्यामुळे केवळ वाचनाचा आनंदच नव्हे, तर वेळेचे नियोजन, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन यांची प्रेरणाही विद्यार्थ्यांना मिळाली.

विद्यार्थ्यांबरोबर  प्राचार्य डॉ गजानन खाडे, उपप्राचार्य प्रा वनिता खडके,प्रा दिपा लोहार,प्रा अयोध्या धुमाळ,प्रा प्रमिला मळगे,प्रा बाबासो माळवे यांच्या सह सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. पुस्तक वाचताना विद्यार्थ्यांमध्ये दिसणारी शांतता, एकाग्रता आणि उत्सुकता ही या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

‘ग्रंथ हेच ज्ञानाचे मंदिर आणि वाचन हीच ज्ञानाची साधना’ या विचाराने प्रेरित हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्राचार्य डॉ गजानन खाडे सर यांनी व्यक्त करण्यात आला.

Comments