जैन समाजाच्या हितासाठी व नवीन पिढीसाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

 जैन समाजाच्या हितासाठी व नवीन पिढीसाठी

दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर



दक्षिण भारत जैन सभेचे 104 वे नैमित्तिक अधिवेशन संपन्न


कोल्हापूर दि 2 (जिमाका) 

 दक्षिण भारत जैन सभा ही जैन समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्यरतआहे.समाजाच्या विविध अडीअडचणीच्या काळात मदत करणारी जैन सभा असून समाज हित व नवीन पिढीसाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. 

          दक्षिण भारत जैन सभेचे 104 वे नैमित्तिक अधिवेशन महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित करण्यात आले होते.यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सर्वश्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सतेज पाटील,राहूल आवाडे,अभय पाटील (बेळगाव),

लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ,कोल्हापूर व जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ,नांदणी, माजी आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे,वीरकुमार पाटील,संजय पाटील (बेळगाव) जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे,दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष भालचंद्र पाटील प्रामुख्याने उपस्थित होते

         पालकमंत्री आबिटकर म्हणाले,जैन समाजा मार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम हे भावी पिढी घडविण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या समाजात शिस्तबद्ध आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन करण्यात येते. प्रत्येकाला मदत करण्याची भावना असणारा हा अत्यंत प्रागतिक समाज आहे.प्रत्येकाने जगावे आणि इतरांना जगू द्यावे अशी भावना ठेवण्याचे काम जैन समाजाने केले आहे.भविष्यात भावी पिढीसाठी जैन समाज जो निर्णय घेईल त्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी सहकार्य करु,असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

  कोल्हापूरवासियांच्या भावनेशी जुळलेल्या माधुरी हत्तीला नांदणी येथील मठात परत आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री आबिटकर म्हणाले.  

          वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जैन समाज हा धार्मिक आणि अहिंसा जपणारा समाज आहे.दक्षिण भारत जैन सभेमार्फत गरजु विद्यार्थांसाठी तसेच शेतकरी वर्गासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.उत्तम संघटन म्हणून कशा पध्दतीने काम करावे याचे जैन समाज हे एक उत्तम उदाहरण आहे.कागल येथील जैन समाजाला बक्षीस म्हणून दिलेली जागा विकसित करु त्याचबरोबर कागल तालुक्यातील बामणी येथील भगवान महावीराचे एक पुरातन मंदिर असून भगवान महावीर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम निश्चितपणाने मार्गी लावू असे अभिवचन श्री मुश्रीफ यांनी या कार्यक्रम प्रसंगी दिले. 

          यावेळी आ.राहुल आवडे यांनी हातकणंगले तालुक्यातील श्रीक्षेत्र कुंथुगिरी व श्रीक्षेत्र बाहुबली या मंदिरासाठी जिल्हा नियोजनमधून अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली असता त्याला त्यांनी सकारात्मकता दर्शविली.

             यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे मुखपत्र प्रगतीचे व जिनविजय या डिजिटल अंकाचे प्रकाशन पालकमंत्री आबिटकरांच्या तर दक्षिण भारत जैन सभेची पंचसुत्री स्मरणिकेचे प्रकाशन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

         या अधिवेशनात खा.छत्रपती शाहू महाराज, दोन्ही जैन धर्मगुरु,आ.सतेज पाटील,आ.यड्रावकर,आ. राहूल आवाडे, प्रकाश आवाडे ,दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष भालचंद्र पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते द.भारत जनसभेचे सॉफ्टवेअर अनावरण,जैन सभेच्याकार्य पुस्तिकेचे प्रकाशन आ.सतेज पाटील तर डॉ.चौगुले यांच्या लोकसंवाद पुस्तकाचे प्रकाश आ.राहूल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.                                                            या जैन समाजातील दत्तक पालक योजने साठी आ.सतेज पाटील यांनी 10 लाख रुपयांची देणगी यावेळी दिली. या अधिवेनशात गेल्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला तसेच आगामी वर्षासाठीचे संकल्प,समाजहिताच्या योजना, संघटना विस्तार आणि पुढील कार्याची दिशा निश्चित करण्यात आली. 

                 अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या अधिवेनशासाठी रावसाहेब पाटील , संजय शेटे,अभिनंदन पाटील,अनिल पाटील तसेच नगरसेवक,नगरसेविका त्याचबरोबर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील जैन समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर,पदाधिकारी,प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

                  

Comments