श्रावण मास कावड यात्रेची तयारी पूर्ण

 श्रावण मास कावड यात्रेची तयारी पूर्ण



गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीपासून कावड यात्रेला प्रारंभ

कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क 

मोठी आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या आणि धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या येथील श्री एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून या कावड यात्रेची जय्यत तयारी सुरू होती.



श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही कावड यात्रा काढण्यात येणार असून, गिरनार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचे पवित्र जल कावडीद्वारे आणून शिवचरणी अर्पण करण्यात येणार आहे.

गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पंचगंगा नदी येथे पूजन करून कावड यात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर गंगावेस येथील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गुजरी, जैन मंदिर, महाद्वार रोड, श्री अंबाबाई मंदिर, बिनकामे गणेश मंदिर मार्गे कावड यात्रा श्री एकमुखी दत्त मंदिरात पोहोचेल. तेथे सामुदायिक आरती व प्रसादाने यात्रेचा समारोप होणार आहे.

कावड यात्रा मार्गावर गुजरी मित्र मंडळ, श्री महालक्ष्मी भक्त मंडळ यांच्यासह विविध संस्था व संघटनांच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात येणार आहे.

या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्तसंप्रदायातील माता-भगिनी तसेच युवकांनी मंदिरा मार्फत दिलेले टी-शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवावी आणि कोल्हापूरची आध्यात्मिक ओळख अधिक व्यापक व अधोरेखित करावी, असे आवाहन मठाधिपती श्री संतोष गिरी गोसावी महाराज यांच्या प्रेरणेने पारस ओसवाल किशोर घाटगे मिलिंद कुलकर्णी राजेंद्र मकोटे संतोष गोसावी अरुण गवळी सागर ठाणेकर सह संयोजकांनी केले आहे.

Comments