शिवनेरीवरील शिवछत्रपतींच्या पवित्र पादुकांचे कोल्हापुरात उत्स्फूर्त स्वागत
छत्रपती शिवाजी पुलापासून तोरस्कर चौकापर्यंत भव्य मिरवणूक; अंबाबाई व जुना राजवाडा येथे दर्शन
कोल्हापूर, दि. १ सिटी न्यूज नेटवर्क
श्रीशिवजन्मभूमी श्रीशिवनेरी येथून पालखीतून आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ पवित्र पादुकांचे शनिवारी कोल्हापुरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर यांच्या वतीने ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पुलावर स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवछत्रपतींच्या पादुकांचे दर्शन घेतले.
सशक्त भारत निर्माणासाठी जनजागरण अभियानांतर्गत सुरू असलेल्या "शक्तिधारा – भक्तिसागर महासंगम" या उपक्रमात श्रीशिवनेरीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पादुकांचा महाराष्ट्रभर प्रेरणादायी प्रवास सुरू आहे. श्री रायगड येथे ३५३ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त श्री काशी विश्वेश्वराच्या साक्षीने या पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुरंदर, पावनखिंड, विशाळगड येथे आई वाघजाईचे तसेच दख्खनचा राजा श्री जोतिबा यांचे दर्शन घेत हा पवित्र प्रवास शनिवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई यांच्या दर्शनासाठी कोल्हापुरात दाखल झाला.
छत्रपती शिवाजी महाराज पुलावर महापौर रुपाराणी निकम, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून पवित्र पादुकांचे स्वागत केले. त्यानंतर हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी शिवछत्रपती व शंभूराजे यांच्या जयघोषात छत्रपती शिवाजी पुल ते तोरस्कर चौकपर्यंत पादुका डोक्यावर घेऊन भव्य मिरवणूक काढली. त्यानंतर पादुका करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आल्या.
यानंतर भवानी मंडप येथील जुना राजवाड्यातील देवारात पवित्र पादुका ठेवण्यात आल्या. यावेळी यशराजे छत्रपती यांनी सहकाऱ्यांसह पादुकांचे स्वागत करून दर्शन घेतले. शिवनेरीवरून पादुका राजवाड्यात आणल्याचा विशेष आनंद शिवभक्तांनी व्यक्त केला. तसेच दरवर्षी या पवित्र पादुका जुना राजवाडा व श्री अंबाबाई यांच्या दर्शनासाठी कोल्हापुरात याव्यात, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या स्वागत सोहळ्यास महापौर रुपाराणी निकम, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दिपक देसाई, शहराध्यक्ष विलास मोहिते, नगरसेवक प्रताप जाधव, दिपक काटकर, अजिंक्य आपके, ऐश्वर्या मुणीश्वर, हिंदूराव शेळके, सुधारक वडगावकर, आनंदराव कवडे, बबन लगारे, प्रविण चौगले, अनिल शिंदे, योगेश पाटील, अभिषेक पाटील, अविनाश साळोखे तसेच अजिंक्य फाऊंडेशनचे विद्यार्थी आणि असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment