कोल्हापूर आगारात नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ ’ बस दाखल; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते लोकार्पण

 कोल्हापूर आगारात नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ ’ बस दाखल; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते लोकार्पण



कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर आगाराच्या ताफ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ ’ बस दाखल झाल्या आहेत. या नव्या बससेवेचे लोकार्पण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी एस.टी. महामंडळाकडून विविध आगारांमध्ये नवीन बस दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर आगाराला पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ ’ बस उपलब्ध झाल्या आहेत.

या बसमुळे कोल्हापूर आगारातील बससेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, ग्रामीण तसेच शहरालगतच्या मार्गांवरील प्रवाशांना त्याचा लाभ मिळणार आहे. जुन्या बसांवरील प्रवाशांचा ताण कमी करण्याबरोबरच नियमित आणि वेळेवर बससेवा देण्यासही या नव्या बस उपयुक्त ठरणार आहेत.

उद्घाटनप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूरकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. नव्या 'राजमाता जिजाऊ' बसेसमुळे प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळतील.  प्रवाशांना चांगली सेवा मिळणे ही एस.टी. महामंडळाची प्राथमिकता असल्याचे सांगितले. नव्या बसचा योग्य वापर करून प्रवाशांना सुरक्षित व समाधानकारक सेवा देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी उपाधीक्षक (धावशाखा) संजयसिंह चव्हाण,विभागीय वाहतूक अधिकारी अनिल म्हेत्तर, विभागीय वाहतूक अधिक्षक सागर पाटील, सुरक्षा व दक्षता कधिकारी भानुदास मदने, बसस्थानक प्रमुख मल्लेश विभुते,आगार व्यवस्थापक गणेश कोळी,स.का. अधिक्षक अतुल मोरे, विजय निगडे,

मानीनी तेलवेकर यांचेसह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, चालक-वाहक, कार्यशाळा कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. नव्या ‘राजमाता’ बस कोल्हापूर आगाराच्या सेवेत दाखल झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Comments