चित्पावन संघाच्या वतीने विविध पुरस्कार, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 चित्पावन संघाच्या वतीने विविध पुरस्कार, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार



यशस्वी होण्यासाठी कौशल्यासमवेत गुणही आवश्यक ! - आदेश गोखले, माजी संचालक, आय.बी.एम्.


कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क 

प्रत्येकाकडे विशेष असे प्रावीण्य असते, तसेच कौशल्य असते. या कौशल्यासमवेत सतत शिकण्याची वृत्ती, इतरांना समजून घेणे यांसह अन्य गुणही आवश्यक असतात. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी कौशल्यासमवेत गुणही आवश्यक आहेत. आजच्या युगात स्पर्धा ही आवश्यकच आहे; मात्र ही स्पर्धा प्रत्येकाने स्वत:शी करावी, असे मौलिक मार्गदर्शन पुणे येथील आय.बी.एम्.चे माजी संचालक, ‘मेडीपर्व’ आस्थापनेचे सहसंस्थापक आणि ‘आय. टी.’ क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले श्री. आदेश गोखले यांनी केले.



हिरक महोत्सवी कोल्हापूर चित्पावन संघाच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम येथे ‘विद्यार्थी गुणगौरव आणि मान्यवराचे सन्मान-२०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमात ‘आदर्श माता’ म्हणून श्रीमती मनिषा काळे, ‘वैदिक’ सन्मान सांगली येथील वेदमूर्ती दत्तात्रय पुरुषोत्तम बापट यांना, ‘सामाजिक कार्यकर्ता’ पुरस्कार कोल्हापूर येथील श्री. संजीव चिपळूणकर यांना, तर आदर्श पत्रकार म्हणून दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेष वरिष्ठ प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांना देण्यात आला.

या कार्यक्रमात ‘दामोदर शिवराम आणि कंपनी’ या चहाच्या व्यवसायात शंभरीकडे वाटचाल करणार्‍या समूहाचे विद्यमान अध्यक्ष श्री. प्रकाशकाका गद्रे आणि नेत्र शल्यचिकीत्सक डॉ. माधव खरे यांना ‘समाजभूषण’ या  विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी संघाचे अध्यक्ष श्री. मकरंद करंदीकर, उपाध्यक्ष श्री. प्रसाद भिडे, संगीता आपटे, सीमा गोखले,सर्वश्री केदार जोशी, नंदकुमार मराठे, निखिल गोखले,  किरण जोशी ऋषिकेश लिमये, संतोष साने, मोहन दातार, विष्णू वझे, महेश खाडिलकर, निनाद खरे, लेखापरीक्षक रोहित परांजपे यांसह संस्थेचे विविध पदाधिकारी, मान्यवर, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. माधव खरे म्हणाले, ‘‘आताच्या तरुणांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत सहभागी होत नवीन व्यवसाय करून स्वत:चा ठसा उमटवावा. कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा ही अनिवार्य असते आणि त्याला सामोरे जात अथक परिश्रम केल्यास यश निश्‍चित मिळते.’’

गेली २६ वर्षे सनातन प्रभात हिंदु राष्ट्राचा वसा घेऊन पुढे जात आहे ! - श्री. अजय केळकर

या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना श्री. अजय केळकर म्हणाले, ‘‘हा पुरस्कार मिळाल्याविषयी मी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो, तसेच चित्पावन संघाचे आभार व्यक्त करतो. गेली २६ वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी कार्यरत असून हिंदु राष्ट्राचा वसा घेऊन पुढे जात आहे. हिंदूंची ‘इकोसिस्टम’ सिद्ध होण्यासाठी सनातन प्रभात सातत्याने प्रयत्नशील असून आहे. सनातन प्रभात केवळ मराठीच नाही, तर हिंदी, इंग्रजी, कन्नड या भाषांमध्येही प्रकाशित होते. हिंदूसंघटन करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत सनातन प्रभात कटीबद्ध असेल.’’

Comments