शिंगणापूर ग्रामसभा वादळी; प्रॉपर्टी कार्ड, एससी निधीवरून ग्रामस्थ आक्रमक

 

शिंगणापूर ग्रामसभा वादळी; प्रॉपर्टी कार्ड, एससी निधीवरून ग्रामस्थ आक्रमक



कोल्हापूर (शिंगणापूर ) ३१ सिटी न्यूज नेटवर्क 

करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा उपसरपंच रविंद्र चौगले यांच्या अध्यक्षतेखाली वादळी वातावरणात पार पडली. प्रॉपर्टी कार्डधारकांचे असेसमेंट न करणे, अनुसूचित जाती वस्त्यांतील विकासकामांसाठी मंजूर झालेला २५ लाख रुपयांचा निधी परत पाठवणे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांची अनुपस्थिती यांसह विविध प्रश्नांवर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.



ग्रामसभेच्या सुरुवातीलाच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक अनुपस्थित असल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला. ग्रामसेवक गैरहजर असल्याने ग्रामपंचायत क्लार्क संदिप चव्हाण यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले. तसेच १७ पैकी केवळ ९ सदस्य ग्रामसभेला उपस्थित होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.

सभेत पूरबाधित गावठाणातील प्रॉपर्टी कार्डधारकांचे असेसमेंट होत नसल्याचा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावर उपसरपंच रविंद्र चौगले यांनी महिन्याभरात नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर गावातील पाणंद रस्ते, भक्त निवासाच्या भाडेवाढीचा प्रश्न, व्यायामशाळेची दुरुस्ती, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तसेच अनुसूचित जाती वस्त्यांमधील विकासकामे यावर चर्चा झाली.

२५ लाखांचा निधी परत पाठवल्याचा मुद्दा ऐरणीवर

अनुसूचित जाती वस्त्यांमधील रस्त्यांसाठी मंजूर झालेला २५ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीने परत पाठवल्याचा मुद्दा ग्रामसभेत चांगलाच गाजला. ग्रामपंचायत सदस्यांच्या पॅनेलचे प्रमुख अमर पाटील यांनी हा निधी स्वीकारणार नसल्याचे सांगितल्याने बौद्ध समाजातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

मंजूर निधी परत पाठविण्याच्या भूमिकेविरोधात बौद्ध समाजातील नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला असून, संबंधित निर्णयाविरोधात पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे.

ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रश्नांवर समाधानकारक चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामसभा आटोपती घेण्यात आली. प्रश्न मांडण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अर्जुन मस्कर, पोलीस पाटील रवींद्र जाधव, मुख्याध्यापक अशोक कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


‘२५ लाखांचा मंजूर निधी परत पाठवण्याचा आडमुठेपणा करू नये’

“अनुसूचित जाती वस्त्यांतील विकासकामांसाठी मंजूर झालेला २५ लाख रुपयांचा निधी परत पाठवण्याचा आडमुठेपणा ग्रामपंचायतीने करू नये. अन्यथा या निर्णयाविरोधात वरिष्ठ पातळीवर दाद मागितली जाईल.”

तुषार कांबळे, वंचित बहुजन आघाडी, शिंगणापूर

Comments