ॲड पी आर मुंडरगी स्मृती एच टू ई महाराष्ट्र राज्य महिलांची निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेचे कोल्हापुरात आयोजन

 ॲड पी आर मुंडरगी स्मृती एच टू ई महाराष्ट्र राज्य  महिलांची निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेचे कोल्हापुरात आयोजन



 कोल्हापूर21 सिटी न्यूज नेटवर्क 

  ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम पुरस्कृत ॲडव्होकेट पी.आर. मुंडरगी स्मृती एच् टू ई महाराष्ट्र राज्य महिलांची निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम येथे आयोजित केल्या आहेत. जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने या स्पर्धा आयोजित केले आहेत.



  तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा स्विस् लिग पद्धतीने क्लासिकल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात होणार आहेत. या स्पर्धेतून चार महिलांची निवड तेलंगणा येथे दिनांक 18 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय वरिष्ठ महिला  राष्ट्रीय निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात केली जाणार आहे.या स्पर्धेमध्ये पहिल्या दहा क्रमांकावरील विजेत्यांना एकूण बहात्तर हजार रूपयांची रोख व चषक बक्षीसे म्हणून ठेवले आहे.  विजेत्याला रोख 15  हजार व चषक उपविजेत्याला रोख दहा हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख साडेसात हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त 7, 9,11,13 व 15 वर्षाखालील प्रत्येक गटातील मुलींना दोन असे एकूण 10 चषक उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.



फक्त महाराष्ट्रातील महिला या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेल्या बुद्धिबळपटूस एक हजार रुपये व निवड न झालेल्या बुद्धिबळपटूस दोन हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अधिकृत  संकेतस्थळावर प्रवेश फीसह नावनोंदणी करावयाची आहे‌.

ही स्पर्धा ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम ने ॲडव्होकेट पी.आर्.मुंडरगी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ॲडव्होकेट अशोक मुंडरगी यांच्या सहकार्याने प्रायोजित केल्या आहेत.

या स्पर्धा आंतरराष्ट्रीय गुणांकनाच्या होणार असल्याने महाराष्ट्रातील महिला बुद्धिबळपटूना क्लासिकल आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळण्यासाठी व वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.विशेषकरून स्थानिक कोल्हापूर जिल्हातील व शेजारील सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बुद्धिबळपटूना सुवर्णसंधीच आहे.

वरील माहिती चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले, उपाध्यक्ष धीरज वैद्य,सचिव मनिष मारुलकर, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉक्टर दीपक आंबर्डेकर, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी व कार्यवाह श्रीकांत लिमये यांनी पत्रकाद्वारे  वरील माहिती दिली आहे.

Comments