ॲड.पी आर मुंडरगी स्मृती महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात प्रारंभ

 ॲड.पी आर मुंडरगी स्मृती महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात प्रारंभ

बुद्धिबळ सर्वांगीण विकासासाठी उपयोगी - निलोत्पल



पोलीस अधीक्षक निलोत्पल व जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस यांनी बुद्धिबळाच्या पटावर चाल करून महाराष्ट्र राज्य महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन केले यावेळी डावीकडून आरती मोदी, पौर्णिमा उपळावीकर, भरत चौगुले, श्रीकांत लिमये, किरण लोंढे, ॲड. विवेक शुक्ल, प्रा. अरुण मराठे, मनिष मारुलकर, धीरज वैद्य, डॉ. दीपक आंबर्डेकर, अनिश गांधी व कोडोलीकर


  कोल्हापूर 27 सिटी न्यूज नेटवर्क 

ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या ॲड.  पी आर मुंडरगी स्मृती एचटूई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य महिला निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या.

 मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, परभणी, धाराशिव, रायगड, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली व स्थानिक कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत बहात्तर बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यापैकी 44 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल व जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. यावेळी ॲड. विवेक शुक्ल ( सरकारी वकील), राजवाडा पोलीस स्टेशनचे प्रमुख किरण लोंढे, ब्राह्मण सभा मंगलधामचे अध्यक्ष डॉ.दीपक आंबर्डेकर,सचिव श्रीकांत लिमये, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे,चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले,सचिव मनिष मारुलकर, उपाध्यक्ष धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे,अनिश गांधी, स्पर्धांच्या मुख्य आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळावीकर व उपमुख्य पंच आरती मोदी उपस्थित होते.



यावेळी मार्गदर्शन करताना निलोत्पल म्हणाले की, मला बुद्धिबळाची आवड असून व्यावसायिक खेळाडू नसलो तरी हौशी खेळाडू म्हणून स्पर्धा खेळून आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळाले आहे.मला जीवनात वेळोवेळी बुद्धिबळाचा फायदा झाला असून बुद्धिबळ हे व्यक्तिमत्व विकासासाठी सर्वांसाठी खूप उपयोगाचे आहे.

 29 ऑगस्टपर्यंत तीन दिवसात चालणाऱ्या या स्पर्धां स्विस लीग पद्धतीने क्लासिकल बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात होणार आहेत. या स्पर्धेतून चार जणांची निवड तेलंगणा येथे 18 ते 28 नोव्हेंबर दरम्यान  होणाऱ्या राष्ट्रीय वरिष्ठ महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात करण्यात येणार आहे.

 आज झालेल्या पहिल्या फेरीनंतर अग्रमानांकित पुण्याच्या निहिरा कौल सह, भूमिका वागळे छत्रपती संभाजीनगर, कीर्ती पटेल मुंबई,  दिशा पाटील कोल्हापूर, श्रेया हिप्परगी  सांगली, ईश्वरी जगदाळे सांगली, सई पाटील पुणे, वृत्तिका गमे नागपूर, सानिया तडवी जळगाव, श्रुती काळे छत्रपती संभाजीनगर, श्रावणी उंडाळे पुणे, शर्वरी कबनूरकर कोल्हापूर, सान्वी गोरे सोलापूर  या मानांकितासह एकूण 35 जण संयुक्तपणे एक गुणाने आघाडीवर आहेत.

Comments