रक्षाबंधनासाठी बाजारपेठ सज्ज; राख्यांच्या खरेदीला उत्साहाची झळाळी


रक्षाबंधनासाठी बाजारपेठ सज्ज; राख्यांच्या खरेदीला उत्साहाची झळाळी


कोल्हापूर 27 सिटी न्यूज नेटवर्क 

भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव असलेल्या रक्षाबंधनासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये विविध रंग, आकार आणि आकर्षक डिझाईन्सच्या राख्या दाखल झाल्या असून, राखी खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे.

यंदा बाजारात अगदी १ रुपयापासून ते ३०० रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी आकर्षक कार्टून राख्यांपासून मोती, खडे, रुद्राक्ष तसेच विविध कलाकुसरीच्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, आधुनिक डिझाईन्सची विविधता असली तरी अनेक बहिणींची पसंती आजही पारंपरिक राख्यांनाच असल्याचे दिसून येत आहे.



हिंद कटलरीचे मालक हरीश वाधवानी यांनी ‘ई सिटी न्यूज’शी बोलताना सांगितले की, गेल्या तब्बल ४० वर्षांपासून रक्षाबंधनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या राख्या मिळाव्यात यासाठी संपूर्ण भारतभर फिरून विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध केल्या जातात. अगदी कमी किमतीपासून ते उच्चतम किमतीच्या राख्या ग्राहकांसाठी ठेवण्यात येतात. यंदाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

रक्षाबंधनाचा सण हा केवळ राखी बांधण्याचा दिवस नाही, तर बालपणीच्या असंख्य आठवणींना उजाळा देणारा आणि भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम अधिक घट्ट करणारा दिवस आहे. लहानपणीची भांडणे, एकमेकांची केलेली तक्रार आणि पुन्हा काही क्षणांत जुळणारे नाते… या सगळ्या आठवणींचा धागा राखीत गुंफलेला असतो.

आज शिक्षण, नोकरी आणि व्यवसायामुळे भाऊ-बहिणी अनेकदा वेगवेगळ्या शहरांत राहतात. मात्र रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकमेकांना भेटण्याची ओढ कायम असते. त्यामुळे बाजारात राखी खरेदी करताना अनेक बहिणींच्या चेहऱ्यावर उत्साह तर भावासाठी काहीतरी खास घेण्याची लगबग दिसून येत आहे.

राखी किती रुपयांची आहे, यापेक्षा ती कोणाच्या हाताने बांधली जाते आणि त्या धाग्यामागे किती प्रेम आहे, याला अधिक महत्त्व असते. म्हणूनच शेकडो प्रकारच्या राख्यांमध्येही बहिणी आपल्या भावासाठी मनापासून एक राखी निवडताना दिसत आहेत.

रक्षाबंधनाच्या या पवित्र सणामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, यंदाचा राखी सण प्रेम, आपुलकी आणि भावंडांच्या नात्याच्या आठवणींनी अधिकच रंगणार आहे.

Comments