पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद; वाय. पी. पवार मित्र मंडळाचा डॉल्बीला फाटा

 

पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद; वाय. पी. पवार मित्र मंडळाचा डॉल्बीला फाटा




कोल्हापूर 24 सिटी न्यूज नेटवर्क 

पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत करवीरच्या वाय. पी. पवार मित्र मंडळाने यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. मंडळाच्या 26 वर्षांच्या आगमन मिरवणुकीच्या परंपरेला यंदा खंड देत ‘करवीरच्या राजा’चे आगमन अत्यंत साध्या व पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.

वाय. पी. पवार मित्र मंडळाची स्थापना 1972 मध्ये झाली आहे. सन 2010 पासून मंडळाच्या वतीने गोखले कॉलेज चौक ते वाय. पी. पवार नगर या मार्गावर भव्य गणेश आगमन मिरवणुकीचे आयोजन केले जात होते. या मिरवणुकीत डॉल्बीचा वापर केला जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वाहतूक कोंडी निर्माण होत असे. त्यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाने मिरवणुकीचे मोठे नियोजन केले होते. डॉल्बीसाठी आगाऊ रक्कमही देण्यात आली होती. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल यांनी सर्व गणेश मंडळांना गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक काढावी तसेच विसर्जनाची प्रक्रिया अनंत चतुर्दशीपूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस ठाणे येथे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी मंडळाशी चर्चा करताना मिरवणुकीमुळे वाहतुकीला होणारा अडथळा आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मिरवणूक टाळावी तसेच डॉल्बीचा वापर करू नये, अशी सूचना केली.

पोलीस प्रशासनाच्या या आवाहनाला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मंडळाने मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि डॉल्बीलाही फाटा दिला. ज्या ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार होती, त्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात ‘करवीरच्या राजा’चे वाय. पी. पवार नगर येथे अनावरण करण्यात आले. या निर्णयातून मंडळाने गणेशोत्सवातील उत्साह कायम ठेवत सामाजिक जबाबदारीचे भानही जपले.

मंडळाचे अध्यक्ष रविकिरण गवळी आणि मधुरिमा गवळी यांनी पुढाकार घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत असून, इतर गणेश मंडळांसमोरही त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. या निर्णयासाठी नगरसेवक श्री. नियाज खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप निळपणकर आणि साजिद गवंडी यांनी विशेष प्रयत्न केले.

दरम्यान, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, गणेश चतुर्थीच्या दिवशीच आगमन मिरवणूक काढावी आणि अनंत चतुर्दशीपूर्वी विसर्जन सोहळा पार पाडावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वाय. पी. पवार मित्र मंडळाने घेतलेला हा निर्णय उत्सवाचा आनंद आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर समन्वय साधणारा ठरला आहे.

Comments