मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बस पासचे वाटप; महिला व बालकल्याण समितीचा उपक्रम.
![]() |
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय बॅगांचेही वितरण.
कोल्हापूर, दि. ७ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मोफत बस प्रवास पास उपलब्ध करून देण्याच्या योजनेअंतर्गत आज मनपा मुख्य इमारत चौक येथे बस पास वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महिला व बालकल्याण समितीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील प्रवासाचा खर्च कमी व्हावा या उद्देशाने बस पाससाठी आवश्यक निधीची तरतूद केली आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना बस पासचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपमहापौर अक्षय जरग, महिला व बालकल्याण सभापती कौसर इस्माईल बागवान, उपसभापती दिया अजित ठाणेकर, स्थायी समिती सभापती विशाल शिरोळे, प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापती शिला अशोक सोनुले, पाणी पुरवठा सभापती संगीता सावंत, परिवहन सभापती सत्यजित जाधव, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडेकर, गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य निलीमा शैलेश पाटील, प्राजक्ता अभिषेक जाधव, वंदना विश्वजित मोहिते, अरुणा विशाल गवळी, धनश्री महेश कोरवी, अनुराधा अभिमन्यू मुळीक, जयश्री धनाजी कांबळे तसेच अनेक नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा देरेकर, सहआयुक्त उज्ज्वला शिंदे, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, मनपा शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दर महिन्याच्या ९ तारखेला विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या संकल्पनेतून सामाजिक कार्यकर्ते इस्माईल बागवान यांनी मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय बॅगांचेही वाटप केले. या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या उपक्रमामुळे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत नियमित उपस्थित राहण्यास प्रोत्साहन मिळणार असून, शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment