उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या १६ अनधिकृत नळ कनेक्शनवरून ग्रामस्थ आक्रमक
बिल नाही, डिपॉझिट नाही, नमुना 8 वर नोंद नाही; ग्रामसेवकांना १० दिवसांची नोटीस बजावून खुलासा मागितला
कोल्हापूर (करवीर) 27 सिटी न्यूज नेटवर्क
उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पुष्पणील अपार्टमेंट येथील १६ अनधिकृत पाणी कनेक्शनचा प्रकार समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या १६ कनेक्शनबाबत डिपॉझिट, पाणी बिल, पावती किंवा नमुना 8 वर कोणतीही नोंद नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जागेवर १६ पीव्हीसी पाइप झाडीत लपविलेल्या अवस्थेत आढळून आल्याचेही निवेदनात नमूद आहे.
सामाजिक कार्यकर्ते एस. राजू माने (उजळाईवाडी) यांनी ग्रामस्थांसह ग्रामविकास अधिकारी महेश खाडे आणि उजळाईवाडी ग्रामपंचायतीकडे या प्रकरणी ‘नोटीस बजावून खुलासा पत्र’ देण्याची मागणी केली आहे. या पत्रात १६ नळ कनेक्शन नेमक्या कोणाच्या आदेशाने देण्यात आली, त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची सहमती होती का, तसेच संबंधित नोंदी व आर्थिक व्यवहार कुठे आहेत, याबाबत खुलासा मागण्यात आला आहे.
निवेदनानुसार, या कनेक्शनसाठी पाणी डिपॉझिट भरले आहे का, मासिक पाणी बिल आकारण्यात आले आहे का आणि बिल रजिस्टरमध्ये त्याची नोंद आहे का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच नमुना ७ वर केवळ घरपट्टीची रक्कम दाखवण्यात आली असून पाणीपट्टीचा आकार कुठे आहे, असा सवालही करण्यात आला आहे.
याशिवाय, प्रत्यक्ष पाहणीवेळी १६ पीव्हीसी पाइप झाडीत लपविलेल्या अवस्थेत आढळले असून त्यांना मीटर बसवलेले नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या कनेक्शनसाठी ठराव, ग्रामपंचायत सदस्यांची सहमतीपत्रे आणि संबंधित आदेशाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘हा प्रकार भ्रष्टाचाराचा असून ग्रामपंचायतीचा महसूल बुडवला जात आहे,’ असा आरोप एस. राजू माने यांनी केला आहे. संबंधित प्रकरणात पुरावा म्हणून नमुना ७ आणि प्रत्यक्ष पाहणीचे फोटो जोडल्याचेही निवेदनात नमूद आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला १० दिवसांची मुदत देत खुलासा मागितला आहे. या मुदतीत लेखी खुलासा न दिल्यास गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व लोकायुक्त यांच्याकडे फौजदारी तक्रार दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाकडून अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशीअंती या १६ पाणी कनेक्शनची अधिकृतता, नोंदी आणि महसूल व्यवहाराबाबत नेमके तथ्य स्पष्ट होणार आहे.


Comments
Post a Comment