राजारामपुरी पोलिसांना चोरट्याचे खुले आव्हान

 राजारामपुरी पोलिसांना चोरट्याचे खुले आव्हान



आठवडाभर सुभाषनगर–शेंडा पार्क परिसरात चोरीचा धुमाकूळ; भाजी मार्केट व खाऊ गल्लीतील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर ०१ सिटी न्यूज नेटवर्क 

राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाषनगर, शेंडा पार्क येथील भाजी मार्केट व खाऊ गल्लीमध्ये गेल्या आठवडाभरापासून अज्ञात चोरट्याने चोरीच्या घटनांची मालिका सुरू ठेवली असून, परिसरातील लहान व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सँडविच गाडी, 65 गाडी, क्रिस्पी वडा सेंटर, पान शॉप, चहाची गाडी तसेच इतर हातगाडी व्यावसायिकांना चोरट्याने लक्ष्य केले आहे. वारंवार होणाऱ्या चोरीमुळे संबंधित व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून, त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे.

स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, चोरीच्या घटना सातत्याने घडत असतानाही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे परिसरात पोलिसांच्या गस्तीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करून आरोपीला तातडीने अटक करावी, तसेच चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राजारामपुरी पोलिसांकडे केली आहे.

चोरीच्या वाढत्या घटनांमुळे सुभाषनगर–शेंडा पार्क परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

Comments