किकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ED मार्फत चौकशी करा : राजवर्धन नाईक निंबाळकर

 

किकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ED मार्फत चौकशी करा : राजवर्धन नाईक निंबाळकर


कोल्हापूर 24 सिटी न्यूज नेटवर्क 

किकवी येथे गोकुळ दूध संघाने केलेल्या प्लांट खरेदी व्यवहाराची स्वतंत्र आणि सखोल चौकशी एसआयटी किंवा ईडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष (पूर्व ग्रामीण) राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी किकवी येथील गोकुळच्या प्लांट खरेदीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मावळत्या सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देण्याऐवजी किंवा खरेदी व्यवहार पारदर्शक असल्याचा खुलासा करण्याऐवजी युतीचे संचालक वेगळ्याच मुद्द्यांकडे वळताना दिसले, असा आरोप नाईक निंबाळकर यांनी केला.

या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर अनेकांना विनाकारण बदनामीला सामोरे जावे लागत असून, हा प्रकार थांबवण्यासाठी व्यवहाराची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

“जर हा व्यवहार खरोखरच चोख असेल, तर चौकशी हा धोका नसून त्यांच्या प्रामाणिकतेची पावती ठरेल,” अशी भूमिका नाईक निंबाळकर यांनी मांडली. राजकीय मतभेद असले तरी संस्थेच्या हिताचा विचार करून व्यवहारातील सर्व बाबी सभासद आणि जनतेसमोर स्पष्ट झाल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

व्यवहाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

किकवी खरेदी व्यवहाराबरोबरच विविध आरोपांमध्ये नेमके किती तथ्य आहे, प्रत्यक्ष खर्च किती झाला, किती बचत झाली, कोणाला, कधी आणि किती रक्कम अदा करण्यात आली तसेच कोणत्या व्यवहारासाठी ही रक्कम देण्यात आली, याची सविस्तर माहिती देणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणीही भाजपच्या वतीने गोकुळच्या प्रशासकांकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोप-प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवण्याऐवजी सत्य परिस्थिती सभासद आणि जनतेसमोर आली पाहिजे, हा आपला उद्देश असल्याचे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

विजय ढेरे यांच्या भूमिकेबाबतही खुलासा मागणार

गायत्री कोल्ड स्टोरेजचे विजय प्रकाश ढेरे यांना यापूर्वी अधिकचे पैसे देण्यात आल्याचे मित्रपक्षाकडून सांगण्यात आल्याचा दावा नाईक निंबाळकर यांनी केला. ढेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेश पदाधिकारी असून दोन वेळा पक्षाचे अधिकृत उमेदवार राहिले आहेत, असा उल्लेख त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर विजय ढेरे यांच्याबाबत करण्यात येणारे आरोप कितपत योग्य आहेत, याचा खुलासा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी करावा, अशी मागणी करण्यासाठी आपण लवकरच बारामती येथे जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचेही नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

ही भूमिका कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहमतीने जाहीर करण्यात येत असल्याचे राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

Comments