RTO वाहन पोर्टल दोन महिन्यांपासून ठप्प! शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; कार डीलर्स संतप्त

 

RTO वाहन पोर्टल दोन महिन्यांपासून ठप्प! शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; कार डीलर्स संतप्त





सोमवारपर्यंत पोर्टल सुरू करा, अन्यथा गुरुवारी RTO कार्यालयाला टाळे ठोकणार; कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचा इशारा

कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ‘वाहन’ पोर्टल गेल्या एक ते दोन महिन्यांपासून ठप्प असल्याने वाहन व्यवसाय अक्षरशः ठप्प झाला आहे. वाहन खरेदी-विक्री, मालकी हक्क हस्तांतरण, नवीन वाहन नोंदणी यांसह आरटीओशी संबंधित विविध कामांना मोठा फटका बसला असून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा गंभीर आरोप कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनने केला आहे.

पोर्टल बंद असल्यामुळे कार डीलर्ससोबतच वाहनमालक आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. अनेक व्यवहार रखडले असून, ग्राहक आणि वाहन विक्रेत्यांना दररोज आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. मात्र, समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असल्याचा आरोप असोसिएशनने केला.

या प्रश्नावर आयोजित पत्रकार परिषदेत असोसिएशनचे सचिव इजाज नागरकट्टी यांनी शासन आणि परिवहन विभागावर जोरदार टीका करत आंदोलनाचा इशारा दिला.

‘सोमवारपर्यंत पोर्टल सुरू करा, नाहीतर गुरुवारी टाळे ठोकू!’

येत्या सोमवारपर्यंत आरटीओचे वाहन पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरळीत करण्यात यावे, अशी ठाम मागणी असोसिएशनने केली आहे. अन्यथा येत्या गुरुवारी कोल्हापूर आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला.

‘आंदोलनाची वेळ आली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील,’ असा स्पष्ट इशारा असोसिएशनने दिला.

आधार-RC स्पेलिंगच्या नावाखाली ₹५०० दंड का?

वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील (RC) नाव आणि आधारकार्डवरील नावातील स्पेलिंगमध्ये फरक असल्यास नागरिकांकडून ₹५०० दंड आकारण्याच्या नियमालाही असोसिएशनने तीव्र विरोध केला आहे.

शासनाच्या यंत्रणेमधील त्रुटी किंवा पूर्वीच्या नोंदणीतील चुका असतील, तर त्याची शिक्षा सर्वसामान्य नागरिकांना का? असा सवाल उपस्थित करत आधार-RC स्पेलिंगचा नियम तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

PUC साठी OTP सक्तीवरही संताप

PUC प्रमाणपत्रासाठी OTP सक्ती करण्याच्या निर्णयावरही असोसिएशनने आक्षेप घेतला आहे.

PUC आणि OTPचा संबंध काय? असा सवाल करत ही सक्ती तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मोबाईल नंबर बंद असलेले नागरिक, परदेशात असलेले वाहनमालक आणि विविध कारणांमुळे OTP मिळू न शकणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे असोसिएशनने सांगितले.

तसेच वारंवार OTP पाठविण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली.

‘गोवा, कर्नाटक, गुजरातमध्ये नियम नाहीत; मग महाराष्ट्रातच का?’

नवीन नियम लागू करण्यापूर्वी वाहन व्यवसायिकांना आणि नागरिकांना पूर्वसूचना देणे आवश्यक आहे, अशी मागणी असोसिएशनने केली.

अचानक नियम लागू करून नागरिक आणि वाहन व्यवसायिकांना वेठीस धरणे बंद करावे. गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये हे नियम लागू नसतील तर महाराष्ट्रातच त्यांची सक्ती का? असा सवालही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला.

दोन मंत्री असतानाही लोकप्रतिनिधी गप्प?

कोल्हापूर जिल्ह्याला दोन मंत्री असतानाही आरटीओ पोर्टलच्या गंभीर प्रश्नाची अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधीने गांभीर्याने दखल घेतलेली नाही, असा संताप असोसिएशनने व्यक्त केला.

हजारो नागरिक आणि शेकडो वाहन व्यवसायिकांच्या रोजीरोटीशी संबंधित प्रश्न असूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

आता संघर्ष अटळ!

आरटीओ पोर्टल तातडीने सुरू करण्याबरोबरच आधार-RC स्पेलिंग नियम मागे घेणे, PUC साठी OTP सक्ती रद्द करणे आणि कोणताही नवीन नियम लागू करण्यापूर्वी पूर्वसूचना देणे या मागण्यांवर असोसिएशन ठाम आहे.

सोमवारपर्यंत पोर्टल सुरू झाले नाही, तर गुरुवारी आरटीओ कार्यालयाला टाळे; त्यानंतर महाराष्ट्रव्यापी आंदोलन! असा थेट इशारा देण्यात आल्याने आरटीओ प्रशासनासमोरील पेच वाढला आहे.

पत्रकार परिषदेस सचिव इजाज नागरकट्टी, विक्रम मोतीपुरे, जमीर सय्यद, अभिजीत चित्रकार, सुधाकर सासने, प्रशांत पाटील, किरण पाटील, समीर मुल्ला, फैयाज अथणीकर, महेश सकपाळ, शितल दत्तवाडे, समीर तकीलदार यांच्यासह कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

Comments