शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या २५ लाखांच्या निधीला विरोध; भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या २५ लाखांच्या निधीला विरोध; भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर 02 सिटी न्यूज नेटवर्क
करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीसाठी मंजूर झालेला २५ लाख रुपयांचा निधी परत पाठविण्याच्या ठरावावरून वाद निर्माण झाला आहे. या ठरावाला विरोध करत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आज करवीर गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निधीला विरोध करणाऱ्या उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून शिंगणापूर येथील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये काँक्रीट रस्ते करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी प्रशासकीय मान्यतेचे आदेशही झाले आहेत.
मात्र, शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसह १२ सदस्यांनी या निधीला विरोध करणारा ठराव केल्याचा आरोप भाजपा अनुसूचित जाती मोर्चाने केला आहे. तसेच या निधीतून होणाऱ्या कामाच्या निविदा प्रक्रियेलाही विरोध करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकाराच्या निषेधार्थ भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष पांडुरंग वायदंडे यांनी करवीर गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मंजूर निधी नाकारण्यासंदर्भातील ठरावाची चौकशी करावी, संबंधित उपसरपंच व सदस्यांवर नियमानुसार कारवाई करावी आणि मंजूर झालेल्या २५ लाख रुपयांच्या निधीतून विकासकामे तातडीने सुरू करावीत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दरम्यान, निधीला विरोध करणाऱ्या पाच मागासवर्गीय सदस्यांच्या भूमिकेवरही भाजपा अनुसूचित जाती मोर्चाने आक्षेप घेतला असून, त्यांच्या भूमिकेबाबत लेखी खुलासा मागण्यात आला आहे. या प्रकारामुळे शिंगणापूर ग्रामपंचायतीतील निधीचा मुद्दा आता चर्चेत आला असून, मागासवर्गीय नागरिकांमध्येही याबाबत नाराजी व्यक्त होत असल्याचे मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग वायदंडे, प्रदेश सचिव दीपक शिरगावकर, विजय गायकवाड, ओंकार आवळे आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment