शिरोळच्या अजिंक्यताराने फोडली ‘न्यू गुजरी’ची दहीहंडी
कोल्हापूर | ०६ सिटी न्यूज नेटवर्क
सेलेब्रिटी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या न्यू गुजरी मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवात यंदा शिरोळच्या अजिंक्यतारा गोविंदा पथकाने बाजी मारली. तब्बल सात थरांची भक्कम रचना उभी करत अवघ्या पंधरा मिनिटांत दुसऱ्या प्रयत्नात ३५ फुटांवरील दहीहंडी फोडत पथकाने एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. दहीहंडीचा थरार आणि मनोरंजनाची मेजवानी अशा दुहेरी पर्वणीचा अनुभव करवीरवासीयांनी घेतला.
न्यू गुजरी मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवाचे यंदा ४० वे वर्ष होते. गुजरी कॉर्नर, महाद्वार रोड येथे आयोजित या सोहळ्याला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तब्बल चार तास विविध मनोरंजनाचे कार्यक्रम झाल्यानंतर दहीहंडीचा थरार सुरू झाला.
अजिंक्यतारा गोविंदा पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने थरांची रचना करत हंडीपर्यंत मजल मारली. पहिल्या प्रयत्नानंतर आवश्यक नियोजन करत दुसऱ्या प्रयत्नात गोविंदांनी ३५ फुटांवरील हंडी फोडली. हंडी फुटताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. घोषणांनी महाद्वार रोडचा परिसर दणाणून गेला.
मनोरंजनाची रंगतदार मेजवानी
दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर न्यू गुजरी मित्र मंडळाने यंदा मनोरंजनाचीही खास मेजवानी आयोजित केली होती. कलाकार अजित भोसले यांनी साकारलेली झोपाळ्यावर विराजमान राधा-कृष्णाची आकर्षक प्रतिमा उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होती.
बिग बॉस मराठी फेम रशियन अभिनेत्री इरिना हिने हिंदी-मराठी गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. तसेच बालकलाकार अदिती जाधव, रिद्धीमा शुक्ला, लाखी चौधरी, इशिता, श्रेया धाकटे, प्रियांका रासकर, कुमार संजू आदी कलाकारांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणखी वाढली.
ढोल-ताशांचा निनाद अन् शिवकालीन युद्धकलेचा थरार
दहीहंडीपूर्वी ‘करवीर गर्जना’ ढोल-ताशा पथकाने दमदार सादरीकरण करत वातावरणात उत्साह निर्माण केला. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
ढोल-ताशांचा गजर, युद्धकलेचे थरारक सादरीकरण, कलाकारांचे नृत्य आणि अखेरीस अजिंक्यतारा गोविंदा पथकाने फोडलेली दहीहंडी यामुळे यंदाचा न्यू गुजरी मित्र मंडळाचा दहीहंडी उत्सव विशेष लक्षवेधी ठरला.
या सोहळ्यास आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे महेश जाधव, हेमंत आराध्ये, आदिल फरास, शंकर पाटील, मंगेश चिवटे, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका कौसर बागवान यांच्यासह आजी-माजी नगरसेवक तसेच विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोहळ्याचे संयोजन न्यू गुजरी मित्र मंडळाचे अध्यक्ष किरण नकाते, नगरसेविका माधुरी नकाते, अमर नकाते, सत्यजित सांगावकर, नितीश पटेल, हुसेन सय्यद, निखिल कटके, नियाज नंदीकर, संतोष खोबरे आदींनी केले.


Comments
Post a Comment