इस्कॉन कोल्हापुरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; यज्ञ व श्रीकृष्ण लीलांवरील प्रवचन संपन्न

 इस्कॉन कोल्हापुरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; यज्ञ व श्रीकृष्ण लीलांवरील प्रवचन संपन्न



कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क 

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त कोल्हापूर इस्कॉनच्या श्री श्री राधा माधव मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय जन्माष्टमी महोत्सवाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. यामध्ये यज्ञाचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी श्रीमान राधागोपीनाथदास ब्रह्मचारी यांचे सुश्राव्य प्रवचन झाले.



आपल्या प्रवचनातून श्रीमान राधागोपीनाथदास यांनी “आधुनिक जीवनपद्धतीमध्ये यज्ञाचे महत्त्व” विशद केले. बदलत्या जीवनशैलीमध्ये मानसिक शांतता, सकारात्मकता, आध्यात्मिक समाधान आणि सामाजिक एकात्मता यांसाठी भारतीय संस्कृतीतील यज्ञपरंपरेचे असलेले महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. यज्ञ ही केवळ धार्मिक परंपरा नसून त्यामागे आध्यात्मिक तसेच सामाजिक दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित भक्तांना भारतीय संस्कृतीतील यज्ञाचे महत्त्व आणि त्यामागील आध्यात्मिक विचार समजून घेण्याची संधी मिळाली.



दरम्यान, जन्माष्टमी महोत्सवातील उद्याच्या दिवशी विविध धार्मिक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ४.३० वाजता मंगलआरती होणार असून त्यानंतर दर्शन आरती होणार आहे. सकाळी ८.३० वाजता श्रीमद्भागवतावर विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.सायंकाळच्या सत्रात हरिनाम संकीर्तन आणि महाअभिषेक हे प्रमुख आकर्षण असणार आहे. भक्तिमय संकीर्तनाच्या वातावरणात भगवान श्रीकृष्णाच्या महाअभिषेकाचा सोहळा पार पडणार असून, त्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

रात्री १२ वाजता भव्य महाआरती होणार असून, यावेळी भक्तांना श्री श्री राधा माधव यांचे दिव्य दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. जन्माष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा हा पवित्र क्षण भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भक्तांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने  श्री श्री राधा माधव मंदिर, इस्कॉन कोल्हापूर, हरी ओम नगर, रंकाळ्याच्या पश्चिमेस, कोल्हापूर येथे  उपस्थित राहावे, असे आवाहन इस्कॉन कोल्हापूरच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments