निराधार, श्रावणबाळ व दिव्यांग पेन्शन वाढीसाठी लाभार्थीच्या शिष्टमंडळाने दिले निवासी जिल्हाधिकारीना निवेदन
निराधार, श्रावणबाळ व दिव्यांग पेन्शन वाढीसाठी लाभार्थीच्या शिष्टमंडळाने दिले निवासी जिल्हाधिकारीना निवेदन
कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच दिव्यांग पेन्शन योजनांच्या लाभार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, या समस्या तातडीने सोडवाव्यात तसेच पेन्शनच्या रकमेत वाढ करावी, या मागणीसाठी विविध लाभार्थ्यांच्या वतीने किशोर घाटगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले.
संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष किशोर घाटगे तसेच अखिल भारतीय हिंदू महासभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सामाजिक न्याय मंत्री नरहरी झिरवळ यांच्या नावे हे निवेदन निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे सादर केले.
लाभार्थ्यांना पेन्शन दरमहा नियमितपणे वितरित करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच डीबीटी पोर्टल वारंवार बंद राहत असल्याने लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पोर्टलच्या समस्येमुळे शासकीय कर्मचारी आणि लाभार्थ्यांमध्ये वादाचे प्रसंगही निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे डीबीटी पोर्टल नियमित करून आठवड्याचे सातही दिवस सुरू ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.
दिव्यांग लाभार्थ्यांचे अद्ययावतीकरण होत नसल्याने त्यांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. लाभार्थी प्रमाणिकरणाच्या पोर्टलवर आवश्यक पर्याय उपलब्ध नसल्याने आधार प्रमाणीकरणाचा पर्याय देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. तसेच लाभार्थ्यांची सद्यस्थिती तपासण्यासाठी नागरिक लॉगिनवर स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
महागाईच्या पार्श्वभूमीवर पेन्शन वाढवा
सध्या वाढलेली महागाई आणि लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारी पेन्शन किमान तीन हजार रुपये प्रतिमहिना करण्यात यावी. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करून ती चार हजार रुपये प्रतिमहिना करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
दरम्यान, निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी डीबीटी वेब पोर्टल अनियमितपणे बंद राहत असल्याच्या समस्येची दखल घेतली. या संदर्भात शुक्रवारी बैठक घेऊन समस्या सोडविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी शीलाताई माने, सुनीता भोसले, वर्षा चंद्रकांत शिंदे, प्रशांत पाटील, अंजली साळुंखे, प्रभावती चित्रे, शोभा साळुंखे, नीलांगी पाटील, विकास यादव, पूजा आडदांडे, अनिल कामत, अमर माने तसेच प्रहार संघटनेचे अध्यक्ष किरण काळे यांच्यासह विविध योजनांचे लाभार्थी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment