शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी नगरसेवक मुस्ताक मलबारी यांचा पुढाकार.
गरजू नागरिकांना दिलासा; अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांबाबत जनजागृती.
कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क
शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या निवासी अतिक्रमणांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागसेवक मुस्ताक मलबारी यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार पात्र निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू असून,याबाबत नागरिकांना माहिती मिळावी आणि पात्र लाभार्थ्यांना अर्ज करता यावा, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
शासनाच्या नियमानुसार १ जानेवारी २०११ पूर्वीचे निवासी अतिक्रमण तसेच आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या नागरिकांना या प्रक्रियेचा लाभ मिळू शकतो. अतिक्रमण केवळ निवासी वापरासाठी असणे, संबंधित जागेवर सध्या वास्तव्य असणे आणि इतर शासनाने निश्चित केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. व्यावसायिक अतिक्रमणांना या प्रक्रियेचा लाभ मिळणार नसल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.
पात्र नागरिकांनी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल/मालमत्ता कर पावती, रहिवासी पुरावा, स्वयंघोषणापत्र तसेच इतर शासनमान्य पुरावे सादर करावयाचे आहेत.अर्ज कोल्हापूर महानगरपालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालय क्रमांक १, २, ३ व ४ येथे स्वीकारले जाणार आहेत. अर्ज सादर करण्याची मुदत २ जून २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ अशी आहे.
या महत्त्वाच्या शासकीय योजनेची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून पात्र कुटुंबांना त्यांच्या हक्काची प्रक्रिया समजावून देण्याचे काम मुस्ताक मलबारी यांच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या निवासी अतिक्रमणांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उल्लेखनीय उदाहरण ठरत आहे.
“पात्र नागरिकांनी शासनाच्या नियमांची पूर्तता करून विहित मुदतीत अर्ज करावा. कोणतीही अडचण असल्यास संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा,” असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment