गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

 

गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात



पहिल्याच दिवशी ४७० अर्जांची विक्री; सर्वसाधारण गटातून तिघांचे चार अर्ज दाखल

कोल्हापूर 15 सिटी न्यूज नेटवर्क 

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी तब्बल ४७० उमेदवारी अर्जांची विक्री झाली. तर सर्वसाधारण गटातून तिघांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये नावीद मुश्रीफ, शशिकांत पाटील चुयेकर  आणि बाळासो खाडे यांचा समावेश आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवातीलाच वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मोसमी  चौगुले यांनी उमेदवारांसाठी काही नियम व आचारसंहिता जाहीर केली आहे. त्यानुसार उमेदवारासोबत फक्त एका व्यक्तीलाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

तसेच निवडणूक कार्यालयाच्या आवारात माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यास उमेदवारांना मनाई करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत.

पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याने आगामी काळात अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत कोण कोणते उमेदवार मैदानात उतरतात आणि निवडणुकीचे चित्र नेमके कसे आकार घेते, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments