‘यंदाची वारी पंढरपूरच्या राजाच्या दारी’; चंबुखडी येथे गणेशोत्सवानिमित्त साकारला वारीचा जिवंत देखावा
श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर शहरानजीकच्या चंबुखडी येथील श्री सिद्ध बटुकेश्वर कॉलनीमध्ये यंदा भक्ती आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. येथील गणेश साळोखे यांनी ‘यंदाची वारी पंढरपूरच्या राजाच्या दारी’ हा सुंदर आणि आकर्षक देखावा साकारला आहे. वारीचे हुबेहूब चित्रण करणारा हा देखावा नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
या देखाव्यामध्ये कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ दिंडीचा देखावा, खंडोबा तालीम मंडळाची विठ्ठल सेवा, तसेच पुईखडी येथील रिंगण सोहळा यांचे जिवंत चित्रण करण्यात आले आहे. वारकऱ्यांची भक्ती, दिंडीतील उत्साह, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष यामुळे देखावा पाहताना प्रत्यक्ष वारीचा अनुभव मिळत असल्याची अनुभूती येते.
गणेश साळोखे यांनी हा देखावा साकारण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून अथक मेहनत घेतली आहे. वारीतील विविध प्रसंग बारकाईने अभ्यासून त्यांचे जिवंत चित्रण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या माध्यमातून गणेशोत्सवात धार्मिक परंपरेसोबतच महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले आहे.
या देखाव्याला माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विक्रम जरग यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी देखाव्याची संकल्पना, त्यामधील बारकावे आणि वारीचे करण्यात आलेले जिवंत चित्रण यांचे कौतुक केले. तसेच हा देखावा साकारण्यासाठी मेहनत घेणारे गणेश साळोखे व त्यांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आलेला हा देखावा एकदा आवर्जून पाहण्यासारखा असून, गणेशभक्तांसह वारकरी आणि नागरिकांचेही लक्ष वेधून घेत आहे.
स्थळ : श्री सिद्ध बटुकेश्वर कॉलनी, चंबुखडी, कोल्हापूर


Comments
Post a Comment