पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उबाठा)वतीने आंदोलन; दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी

 पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उबाठा)वतीने आंदोलन; दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी



कोल्हापूर 16 सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर महानगरपालिकेने शहरवासीयांच्या पाणीपट्टीच्या दरात केलेल्या वाढीविरोधात शिवसेना (उबाठा) वतीने  आक्रमक भूमिका घेतली आहे. ही दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी,  दरवाढ मागे  घेतली नाही तर १ तारखेला तीव्र आंदोलन करण्यात येईल असे  शिवसेना (उबाठा)चे जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


शिवसेनेने दिलेल्या निवेदनानुसार, महानगरपालिकेकडून यापूर्वी निवासी दर ₹9.50, व्यावसायिक दर ₹46 आणि औद्योगिक दर ₹74.45 प्रति युनिट आकारला जात होता. मात्र, आता हे दर वाढवून निवासी ₹15, व्यावसायिक ₹58 आणि औद्योगिक ₹90 करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.


या दरवाढीला विरोध करत शिवसेनेने महानगरपालिकेसमोर काही मागण्या मांडल्या आहेत. पाणी गळती रोखावी, प्रत्येक वॉर्डमध्ये स्वतंत्र पथक तयार करून बेकायदेशीर कनेक्शनवर कारवाई करावी, तसेच पाणी गळती व बेकायदेशीर कनेक्शनबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


शिवसेनेच्या निवेदनात, यापूर्वी कोल्हापूर महापालिका आयुक्त व महापौर यांनी प्राथमिक तत्त्वावर सहा महिन्यांत शहरातील पाणी गळतीचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, पाणीगळतीमुळे होणारे नुकसान, पाण्याची वाढती मागणी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक भाराचा विचार न करता नागरिकांवर दरवाढ लादणे योग्य नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.


नागरिकांच्या दिशाभूल करणाऱ्या कररचनेऐवजी पाणीगळती रोखून महसूल वाढवावा आणि पाणीपट्टी दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


यावेळी  जिल्हाप्रमुख विराज पाटील, संजय पवार, विजय देवणे, तसेच महिला व शहर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments