शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या ₹२५ लाख निधीचा वापर न करण्याच्या ठरावाची चौकशी करा
वंचित बहुजन आघाडी करवीर तालुक्याचे प्रशासनाला निवेदन; मंजूर काँक्रिटीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी
कोल्हापूर ०१ सिटी न्यूज नेटवर्क
शिंगणापूर ( ता . करवीर) ग्रामपंचायत हद्दीतील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीच्या विकासासाठी काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाकरिता जिल्हा परिषद सामाजिक न्याय विभागामार्फत मंजूर झालेल्या ₹२५ लाख निधीचा वापर न करण्याबाबत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या ठरावाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी आणि मंजूर विकासकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, करवीर तालुका यांच्या वतीने करण्यात आली.
याबाबत वंचित बहुजन आघाडी, करवीर तालुका यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदर निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी बहुमताच्या आधारे निधीचा वापर न करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
विशेष प्रयोजनासाठी मंजूर झालेला निधी केवळ ग्रामपंचायतीच्या बहुमताच्या ठरावाने वापरता येतो का, तसेच मंजूर विकासकाम थांबविण्याचा अधिकार ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांना आहे का, याची लागू कायदे, शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
सदर निधीचा वापर न करण्यामागे राजकीय अथवा अन्य अनुचित कारणे आहेत का, याची निष्पक्ष चौकशी करावी. चौकशीत विकासकामास जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याचे आढळल्यास संबंधित पदाधिकारी व सदस्यांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच ₹२५ लाखांचा निधी कोणत्या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे, मंजूर काम थांबविण्यासाठी कोणत्या सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे आणि निधीचा वापर न करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.
मंजूर निधीचा उद्देश कायम ठेवून अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील काँक्रिटीकरण रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करावे, तसेच चौकशी व त्यानंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, मंजूर विकासकाम राजकीय अथवा वैयक्तिक कारणांमुळे रखडल्यास वस्तीतील नागरिक विकासकामापासून वंचित राहतील. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून काम सुरू करावे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडी, करवीर तालुका यांच्या वतीने देण्यात आला.
यावेळी करवीर तालुकाध्यक्ष नितीन कांबळे, कोल्हापूर शहर युवा अध्यक्ष अमित नागटिळे, तुषार कांबळे, विशाल शिंदे, रामचंद्र कांबळे, बाळासो कांबळे, राजेंद्र कांबळे आणि अनिल कांबळे उपस्थित होते.
.jpg)
Comments
Post a Comment