ऐतिहासिक खासबाग मैदानातून करवीरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ - श्रीमंत छत्रपती खासदार शाहू महाराज सह मान्यवरांच्या उपस्थितीत गणरायाला भावपूर्ण निरोप; ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने दुमदुमली करवीर नगरी

 ऐतिहासिक खासबाग मैदानातून करवीरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ - श्रीमंत छत्रपती खासदार शाहू महाराज सह मान्यवरांच्या उपस्थितीत गणरायाला भावपूर्ण निरोप; ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने दुमदुमली करवीर नगरी



कोल्हापूर 25 सिटी न्यूज नेटवर्क 

‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’च्या भावपूर्ण जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात करवीर नगरीतील गणेश विसर्जन मिरवणुकीला ऐतिहासिक खासबाग मैदानातून प्रारंभ झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत विघ्नहर्त्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला.



मानाच्या तुकाराम आणि तरी मंडळाच्या गणेशमूर्तीचे पूजन करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर रूपाराणी निकम, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह महापालिका आयुक्त राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद पाटील तसेच विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी अॅड. धनंजय पठाडे, दिलबहार तालीम मंडळाचे विनायक फाळके, पद्माकर कापसे, स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे किशोर घाडगे, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, सदस्य श्वेता परुळेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.


गणेश विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गावर विविध संस्था व संघटनांच्या वतीने गणरायाला निरोप देण्यात येत आहे. कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर सराफ संघ, हिंदू प्रतिष्ठान, सकल हिंदू समाज, सेवा व्रत प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मनसे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, भारतीय जनता पक्ष, सत्यजित कदम युवा मंच, वेताळ पेठ तालीम मंडळ, जनसुराज्य, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती युवा मंच यांच्यासह विविध संस्था-संघटनांकडून मंडळांचे स्वागत करून श्रीफळ देत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे.


पंचगंगा नदीपात्रात विसर्जनासाठी बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बहुतांश गणेशमूर्तींचे विसर्जन रंकाळा तलावाजवळील राधानगरी रोडवरील इराणी खणी येथे करण्यात येणार आहे. या ठिकाणी महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेसह अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.


दरम्यान, इ सिटी न्यूज यांच्या वतीने विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. त्यामुळे शहराबाहेरील भाविकांनाही या ऐतिहासिक सोहळ्याचा अनुभव घेता येत आहे.


यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत प्रथमच प्रमुख मार्गावर सहभागी गणेश मंडळांसाठी वेळेची मर्यादा निश्चित करण्याची यंत्रणा पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात आली आहे. त्यामुळे मिरवणूक नियोजनबद्ध पद्धतीने पार पडून विसर्जन प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.


दरम्यान, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने वातावरण भावूक झाले असून, भक्तांच्या डोळ्यांत विरहाचे भाव आणि मनात पुढील वर्षीच्या आगमनाची ओढ दिसून येत आहे. येत्या वर्षी गणरायाचे आगमन ४ सप्टेंबर रोजी होणार असून, यंदाच्या तुलनेत तब्बल दहा दिवस अगोदर गणरायाचे आगमन होणार आहे.


भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम घडविणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीने करवीर नगरी पुन्हा एकदा गणरायाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे.

Comments