गरजू रुग्णांपर्यंत आरोग्य योजनांचा पोहचविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी आरोग्यदूताची भूमिका बजावावी : जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे

 गरजू रुग्णांपर्यंत आरोग्य योजनांचा पोहचविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी आरोग्यदूताची भूमिका बजावावी : जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे



कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क 

 आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचाही उपचार थांबू नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजना कार्यरत आहेत. या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून त्यांना प्रत्यक्ष उपचाराचा लाभ मिळवून देण्यासाठी गणेशोत्सव मंडळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्यदूताची भूमिका बजावावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले.

राज्य शासनाच्या ‘आरोग्याचा श्रीगणेशा’ या आवाहनाला प्रतिसाद देत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. फिनिक्स कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, न्यू हनुमान तालीम मंडळ आणि बागल चौक तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार संघाच्या सभागृहात हा उपक्रम घेण्यात आला.

आयुष्मान भारतपासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेपर्यंत शासनाच्या विविध योजनांमधून पात्र लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा उपलब्ध होत आहे. मात्र, अनेक गरजू नागरिकांना या योजनांची माहिती नसते. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणीसोबतच शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती, पात्रता आणि उपलब्ध उपचार सुविधांची जनजागृती केली तर अनेक कुटुंबांना त्याचा प्रत्यक्ष फायदा मिळू शकतो, असे पाटोळे यांनी सांगितले.

प्रारंभी फिरोज मुजावर यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांनी आगामी काळातही सातत्याने आरोग्य प्रबोधनाचे उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. अपेक्स हॉस्पिटलच्या अंजली संकपाळ तसेच क्रीडा संघटक व माजी नगरसेवक काका पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

आरोग्य पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी केवळ गणेशोत्सवापुरते आरोग्य उपक्रम मर्यादित न ठेवता वर्षभर, दर महिन्याला विविध आरोग्य प्रबोधन व तपासणी उपक्रम राबविण्यासाठी समन्वयक म्हणून कार्यरत राहण्याचा मनोदय व्यक्त केला. ‘उत्सवातून आरोग्य जनजागृती आणि जनजागृतीतून निरोगी समाज’ हा विचार सातत्याने पुढे नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पाहुण्यांच्या हस्ते आरोग्य शिबी रात तपासणी करणारे अपेक्स हॉस्पिटलचे डॉ. सुहास  बडवे, डॉ. शैलेश, जनसंपर्क अधिकारी नयनिश मोरे, ओम हॉस्पिटलच्या योगी डांगे, युवा ग्रामीणचे बाळासो कांबळे, प्रियांका दादाने, वैभव लक्ष्मीच्या डॉ. ऋतुजा कोळी, प्रतीक्षा डोंगरे, प्राजक्ता कोटकर, सिद्धेश लाड आणि परशुराम कोळी यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना स सन्मानित करण्यात आले.

यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे सदस्य रफिक शेख, गणेशोत्सव मंडळाचे आक्रम मुजावर, ओमकार कवाळे, संग्राम गायकवाड सकलम् चे  अमोल पाटील -सागर ठाणेकर तनुजा देसाई  यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

आरोग्य तपासणी एका दिवसाची असली, तरी आरोग्याची जाणीव वर्षभराची असावी, या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना तपासणीसोबतच प्रतिबंधात्मक आरोग्याची आणि शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती मिळाली. याबद्दल सहभागी नागरिकांनी समाधान व्यक्त केले .

Comments